शाळेला संरक्षण भिंत आणि पाण्याची सुविधा द्या
By admin | Published: June 28, 2016 01:20 AM2016-06-28T01:20:51+5:302016-06-28T01:20:51+5:30
शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव नंदकुमार व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे
गडचिरोली : शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव नंदकुमार व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी भामरागड तालुक्यातील बेजूर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून शैक्षणिक प्रगतीची माहिती विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगदरम्यान डायटचे प्राचार्य रमतकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी निकम, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, आकेवार, शिक्षण विभागातील कर्मचारी अजमेरा, दुर्गे, गेडाम, लता चौधरी, जिल्हा प्रोग्रामर प्रफुल मेश्राम, गटशिक्षणाधिकारी डांगे, भामरागडचे गटशिक्षणाधिकारी दरडमारे, बेजूर शाळेचे मुख्याध्यापक विनीत पद्मावार, शाळेतील शिक्षिका रापर्तीवार साधन व्यक्ती चांगदेव सोरते उपस्थित होत्या.
बेजूर शाळेतील पाच विद्यार्थी व त्यांचे पालक याप्रसंगी उपस्थित होते. शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नेमका कोणता उपक्रम राबवायचा आहे, वर्षभर राबवायचा आहे. सुटीच्या कालावधीत काय केले, शाळेत कंटाळा येत नाही काय?, डिजीटल शाळा म्हणजे काय?, शाळा डिजीटल कधी झाली, शाळेत सोयीसुविधा आहेत काय?, स्वच्छतागृह साफ असतो काय, आदी प्रश्न विद्यार्थ्यांना उपस्थित केले. विद्यार्थ्यांनी या सर्व प्रश्नांची माहिती दिली. पालकांनी शाळेला संरक्षण भिंत नाही, पाण्याची सुविधा नाही. विद्युत नाही या समस्या शिक्षण मंत्र्यांसमोर मांडून सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
कमकुवत विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी नवीन उपक्रम राबवा, लोक सहभाग मिळवून शाळेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्या, पटसंख्या वाढवून ती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा, वृक्ष लागवडीचे नियोजन करा, असे मार्गदर्शन शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शिक्षणमंत्र्यांनी केले. (नगर प्रतिनिधी)