थेट वारसदारांच्या खात्यात जमा हाेणार भविष्य निर्वाह निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:43+5:302021-07-14T04:41:43+5:30
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सेवानिवृत्ती तसेच मयत कर्मचाऱ्यांचे अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव वित्त विभागास सादर केल्यानंतर मंजूर करण्यात ...
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सेवानिवृत्ती तसेच मयत कर्मचाऱ्यांचे अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव वित्त विभागास सादर केल्यानंतर मंजूर करण्यात येणारी रक्कम डीडीद्वारे संबंधित कर्मचाऱ्याच्या पंचायत समिती स्तरावर पाठविली जाते. त्यानंतर संबंधित विभागाकडून/ पंचायत समिती स्तरावरून कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसदारांना त्या रकमेचे प्रदान करण्यात येत असे.
सदर प्रक्रियेदरम्यान भविष्य निर्वाह निधी अंतिम रकमेचे प्रदान होताना बराच मोठा विलंब होत होता. हा मोठ्या प्रमाणात होणारा विलंब टाळण्याच्या दृष्टिने भविष्य निर्वाह निधी मंजूर होणाऱ्या रकमेचे प्रदान हे डीडीद्वारे न करता मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांच्याकडून थेट सेवानिवृत्त कर्मचारी/वारसदार यांचे बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेला आहे.
याकरिता जिल्हा परिषदचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी उमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. सर्वांनी आपल्या स्तरावरून सेवानिवृत्त/ मयत कर्मचाऱ्यांचा अंतिम भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव सादर करताना प्रस्तावासोबत संबंधित कर्मचाऱ्याचे / वारसदाराचे बँक खाते, पासबुकचे छायांकित प्रत तसेच बँक खात्याचे विवरण जोडावे. जेणेकरून रकमेचे प्रदान थेट आरटीजीएसद्वारे संबंधितांच्या बँक खात्यात जमा करता येणार असल्याने होणारा विलंब टळणार आहे.