सौर ऊर्जेच्या माध्यमातून वन्य जिवांसाठी पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:43+5:302021-05-24T04:35:43+5:30
गडचिरोली जिल्ह्यात चपराळा व भामरागड हे दोन अभयारण्य आहेत. चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्यात हरिण, चितळ, नीलगाय, ससा, रानडुक्कर, बिबट ...
गडचिरोली जिल्ह्यात चपराळा व भामरागड हे दोन अभयारण्य आहेत. चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्यात हरिण, चितळ, नीलगाय, ससा, रानडुक्कर, बिबट आदी प्राणी आहेत. सध्या तापमानात वाढ झाल्याने प्राण्यांना पाण्याची गरज भासत आहे. जंगलात पिण्याच्या पाण्याची सुविधा झाल्याने या अभयारण्यात प्राण्यांची संख्याही वाढत आहे. सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे उन्हामुळे अभयारण्यातील सौर पंप आपोआप सुरू होते. सायंकाळी सदर पंप बंद होतो. पाणवठा ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी उतारावरून खाली पडते. पाणवठ्यातील शुद्ध पाणी जनावरांसाठी उपलब्ध झाले आहे. खाली पडलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे जंगलातील प्राणी या चिखलात लोळत असतात. प्राण्याला जखम झाल्यास इतर प्राणी त्याचे चाखण व लोळवण करतात. येथील पाणवठ्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे. चपराळा अभयारण्यात बिबट सोडले आहे. त्यामुळे तेंदूपत्ता तोडणाऱ्या लोकांना जंगलात जाण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे.
बाॅक्स :
१६ पाणवठ्यावर प्राण्यांसाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था
वन विभागाच्या चौकीपासून लगाम व नागुलवाही गावाच्या सीमेपासून रेंगेवाहीपर्यंत एकूण १३४.७८ चौकिमी जागेत चपराळा अभयारण्य व्यापलेला आहे. या अभयारण्यात चितळ, हरिण, नीलगाय, बिबट, ससा आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. तीन वर्षांपासून १६ पंप बसवून सौर ऊर्जेच्या साहाय्याने पाणवठ्यात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी पाण्यासाठी आता रस्त्यावर अथवा गावाकडे येण्याची शक्यता नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांनी सांगितले.