वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 01:48 AM2017-03-19T01:48:20+5:302017-03-19T01:48:20+5:30
राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीकरिता रेल्वे मंत्रालयासोबत भागीदारीतून
अर्थसंकल्पात घोषणा : मार्गाच्या कामाला गती मिळणार
गडचिरोली : राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीकरिता रेल्वे मंत्रालयासोबत भागीदारीतून महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी स्थापण्याकरिता ५० कोटी रूपयांच्या भाग भांडवलासाठी निधी देण्याबरोबरच गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासह अन्य दोन रेल्वे मार्गासाठी १५० कोटी रूपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात शनिवारी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यामुळे वडसा-गडचिरोली या ५० किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रवास आता सुकर होणार आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या रेल्वे मार्गाच्या कामासाठी १८० कोटी रूपये देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या भागीदारीतील १५० कोटी रूपयांत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाला किमान ५० कोटी रूपये मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी मागील महिन्यात रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचेही काम मार्गी लावले. त्यामुळे या वर्षाखेरपर्यंत रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, अशी आशा आता निर्माण झाली आहे. मागील ३० वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाचे काम प्रलंबित होते. भाजप सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली.