अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सव्वा क्विंटल बिज सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:58 AM2018-07-04T00:58:23+5:302018-07-04T00:59:30+5:30
जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाभरातून विविध वृक्षांचे १ क्विंटल २० किलो बिज गोळा केले. सदर बिज अप्पर जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले. मागील काही वर्षांपासून राज्य शासनातर्फे वृक्ष लागवड व बिज संकलीत करण्याचा उपक्रम राबविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाभरातून विविध वृक्षांचे १ क्विंटल २० किलो बिज गोळा केले. सदर बिज अप्पर जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले.
मागील काही वर्षांपासून राज्य शासनातर्फे वृक्ष लागवड व बिज संकलीत करण्याचा उपक्रम राबविला आहे. बिज गोळा करण्याचे प्रत्येक विभागाला उद्दिष्ट असले तरी बहुतांश विभागांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ वृक्ष लागवड करण्यावर विशेष भर दिला जातो. गडचिरोली जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने मात्र यावर्षी सुध्दा बिज गोळा केले. संघटनेच्या प्रत्येक तालुकाध्यक्षाला १० किलो बिज गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार बाराही तालुक्यातील तालुकाध्यक्षांनी सदस्यांच्या मदतीने बिज गोळा केले. जिल्हाभरातून १ क्विंटल २० किलो बिज गोळा झाले. गोळा केलेल्या बिजामध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, करंजी, कडूलिंब व रिठा या बिजांचा समावेश आहे. सदर बिज एका छोटेखानी कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदर बिज गोळा करण्यासाठी गडचिरोली महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांनी पुढाकार घेतला. बिज वितरण कार्यक्रमाला धानोराचे तहसीलदार गणवीर, जिल्हाधिकारी कार्यालय आस्थापना विभागातील तहसीलदार वासनिक, नायब तहसीलदार सुनिल चडगुलवार, किशोर भांडारकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वनिश्याम येरमे, आरमोरी तालुकाध्यक्ष ईश्वर राऊत, ईजीएसचे दहेलवार आदी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा सुध्दा व्यक्त केली.
बिजाच्या मोबदल्यात झाडे मोफत
महसूल कर्मचारी संघटनेने गोळा केलेले बीज सामाजिक वनिकरण विभागाला देण्यात येणार आहे. या मोबदल्यात सामाजिक वनिकरण विभाग यावर्षी महसूल विभागाला मोफत रोपटे उपलब्ध करून देणार आहे. यावर्षी दिलेल्या बिजांची सामाजिक वनिकरण विभाग येत्या काही दिवसांतच लागवड करणार आहे. सदर रोपटे पुढील वर्षी उपलब्ध होणार आहे.