४९९ वनराई बंधाऱ्यातून प्राण्यांना पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:10+5:30
रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन १९८० च्या वनकायद्याच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. मात्र कृषी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. कृषी विभागाच्या वतीने गतवर्षी जिल्हाभरात वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्हाभरात एकूण ४९९ बंधारे पूर्ण करण्यात आले.
रबी हंगामातील विविध पिकांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात सिंचन सुविधा निर्माण व्हावी तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने वनराई बंधारे निर्मितीची मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील वाहत्या व प्रवाहीत नाल्यावर वनराई बंधारे बांधल्यास पाणी अडून भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. तसेच ओलावा टिकून राहते. सदर बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी होतो. याशिवाय वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण होत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जातो. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व कृषी कर्मचाऱ्यांमार्फत कृषी योजना गावपातळीवर पोहोचविल्या जातात. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वन्य व पाळीव प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वनराई बंधारे बांधण्यात आले. एका कृषी सहाय्यकाला पाच वनराई बंधारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १४४ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. एकाला पाच प्रमाणे एकूण ७२० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते. वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात ४९९ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले. उर्वरित २२१ बंधारे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहेत.
४८६ बोड्या पूर्ण; कामावर १६.१५ लाखांचा खर्च
मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला जवळपास ५०० बोड्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत एकूण ३ हजार ४८७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यापैकी ३ हजार ४०६ लाभार्थ्यांनी सेवा शुल्क भरले व ३ हजार २७६ लाभार्थी निकषानुसार पात्र झाले आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी ८९२ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी ४८६ बोड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. २०१९-२० मध्ये बोड्या निर्मितीवर १६.१५ लाखांचा खर्च झाला आहे.