थकीत बिलामुळे पीएससीची वीज कापली
By Admin | Published: November 7, 2016 01:42 AM2016-11-07T01:42:38+5:302016-11-07T01:42:38+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत अडपल्ली माल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे हजारो रूपयांचे विद्युत बिल
सेवेवर परिणाम : कर्मचाऱ्यांसह रूग्ण त्रस्त
मुलचेरा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत अडपल्ली माल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे हजारो रूपयांचे विद्युत बिल थकल्यामुळे महावितरणने या केंद्राचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे रात्री केंद्र व केंद्राच्या परिसरात अंधाराचे साम्राज्य राहत असून येथील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.
अडपल्ली माल प्राथमिक आरोग्य केंद्राकडे गेल्या काही दिवसांपासून हजारो रूपयांचे वीज बिल प्रलंबित होते. महावितरणने संबंधित केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना थकीत वीज बिल भरण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही केंद्राच्या वतीने थकीत वीज बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदर केंद्राचा वीज पुरवठा खंडीत केला. आमगाव माल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्र असून १६ गावांचा समावेश आहे. परिसरातील शेकडो रूग्ण दररोज या आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी येतात. अडपल्ली माल परिसरातील आरोग्य सेवेच्या इतर सुविधा नसल्याने येथे रूग्णांची गर्दी असते. मात्र सदर आरोग्य केंद्राची महावितरणने वीज कापल्यामुळे येथील पंखे व दिवे बंद पडले आहेत. याशिवाय विजेवरील इतर वस्तूही निरूपयोगी ठरल्या आहेत.
आरोग्य केंद्र प्रशासनाने तत्काळ थकीत वीज बिलाचा भरणा करून केंद्रातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी आमगाव माल परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)