‘त्या’ मनाेरुग्णाची सहा महिन्यांनंतर झाली स्वकियांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:00 AM2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T05:00:45+5:30
बाबू भवर (रा. काकंडी, ता. जि. नांदेड) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. भवर हे व्यंकटापूर येथे मागील अनेक दिवसांपासून फिरत हाेते. उपपाेलीस स्टेशन ते गाव परिसरात त्यांचा वावर हाेता. ते मनाेरुग्ण असल्याचे गावातील लाेकांना माहीत हाेते. परंतु त्यांच्या हालचाली संशयास्पद हाेत्या. आधीच नक्षलग्रस्त भाग असल्याने धाेका हाेऊ नये म्हणून पाेलिसांनी त्यांच्या हालचालींवरून चाैकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांची विचारपूस केली. तेव्हा बाबू भवर हे मनाेरुग्ण असल्याचे दिसून आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : पाेलिसांचा कडक व कठाेर स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना ते केवळ आपल्या आक्राळविक्राळ स्वभावाचेच प्रदर्शन करीत नाहीत तर अनेकदा सामाजिक बांधिलकीतूनही काम करतात. अशाच घटनेचा परिचय अहेरी तालुक्याच्या व्यंकटापूर पाेलिसांनी दिला. गावात व उपपाेलीस स्टेशन परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस करून स्वकियांशी भेट घडवून आणली. तब्बल ६ महिन्यांनंतर नांदेड जिल्ह्यातील कुटुंबीयांशी भेट झाल्याने मनाेरुग्ण भारावला.
बाबू भवर (रा. काकंडी, ता. जि. नांदेड) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. भवर हे व्यंकटापूर येथे मागील अनेक दिवसांपासून फिरत हाेते. उपपाेलीस स्टेशन ते गाव परिसरात त्यांचा वावर हाेता. ते मनाेरुग्ण असल्याचे गावातील लाेकांना माहीत हाेते. परंतु त्यांच्या हालचाली संशयास्पद हाेत्या. आधीच नक्षलग्रस्त भाग असल्याने धाेका हाेऊ नये म्हणून पाेलिसांनी त्यांच्या हालचालींवरून चाैकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांची विचारपूस केली. तेव्हा बाबू भवर हे मनाेरुग्ण असल्याचे दिसून आले. त्यांचे नाव, गाव व पत्त्याविषयी विचारपूस करून खात्री केली. त्यानंतर नांदेड ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या पाेलीस निरीक्षकांशी फाेनद्वारे संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून काकंडी गावचे पाेलीसपाटील महादेव व्यंकाेबा बागल यांच्याशी बाेलणी करून ओळख पटविली व नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मिळविला. मनाेरुग्ण इसमाचा भाचा नामदेव कदम (रा. तुपा, ता. जि. नांदेड) यांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी बाेलणी करण्यात आली. नामदेव कदम हे १८ मे राेजी व्यंकटापूर उपपाेलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तेव्हा दाेघांनीही एकमेकांना ओळखले. या भेटीने मामा व भाच्याला अत्यानंद झाला. पाेलिसांच्या मानवतेमुळे आपल्या कुटुंबातील व्यक्ती सुखरूप मिळाली, असे उद्गार नामदेव कदम यांनी काढत जिल्हा पाेलीस दलाचे आभार मानले.
१२ वर्षांपासून हाेते भरकटले
मनाेरुग्ण व्यक्ती आज इथे तर उद्या तिथे, अशी गावाेगाव भटकत असते. अधिक दूर अंतर भरकटल्यास त्याचा गावाशी संपर्क येत नाही व ती व्यक्ती कायमची भरकटते. बाबू भवर हे मागील १२ वर्षांपासून मनाेरुग्ण असून, ६ महिन्यांपूर्वी ते घरातून निघून गेले हाेते, अशी माहिती भवर यांचे भाचे नामदेव कदम यांनी दिली. भ्रमणध्वनीवरच्या चाैकशीनुसार कदम यांनी व्यंकटापूर पाेलिसांकडे बाबू भवर यांचे छायाचित्र ऑनलाईन पाठविले. भवर यांची खात्री पटल्यानंतर त्यांना व्यंकटापूर येथून घेऊन जाण्यास सांगितले.