लहान कुटुंबांबाबत व्हावी जनजागृती
By admin | Published: July 11, 2017 12:43 AM2017-07-11T00:43:06+5:302017-07-11T00:43:06+5:30
जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़...
जागतिक लोकसंख्या दिन : वाढत्या लोकसंख्येचा संसाधनांवर परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़ त्यामुळे २०११ च्या जनगणनेत तब्बल १० लाख ७२ हजार ९०४ लोकसंख्येचा हा जिल्हा विकासाच्या क्षेत्रात अद्यापही पिछाडीवरच आहे़ लहान कुटुंबाबत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ९ लाख ७० हजार २९४ होती़ यात ४ लाख ९१ हजार १०१ पुरूष व ४ लाख ७९ हजार १९३ महिलांचा समावेश होता़ जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या आजही ग्रामीण भागातच आहे़ २००१ मध्ये ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ३ हजार ३३ होती़ यात ४ लाख ५६ हजार ६४७ पुरूष व ४ लाख ४६ हजार ३८६ महिलांचा समावेश होता़ शहरी भागात ६७ हजार २६१ लोकसंख्या होती़ या शहरी लोकसंख्येत ३४ हजार ४५४ पुरूष व ३२ हजार ८०७ महिला होत्या़ २०११ च्या जनगणनेत ग्रामीण व शहरातील लोकसंख्येत बरीच वाढ झाली़ नव्या जनगणनेनुसार ग्रामीण भागाची लोकसंख्या ९ लाख ५३ हजार ८५८ आहे़ यात पुरूष ४ लाख ८२ हजार ७४० व महिला ४ लाख ७१ हजार २२७ महिला आहेत़ शहरी भागात वाढीसह १ लाख १८ हजार ९३७ लोकांची नोंद झाली आहे़ यात ६० हजार ७३ पुरूष व ५७ हजार ८६४ महिलांचा समावेश आहे़
२०११ च्या नव्या जनगणनेत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्याही नमूद करण्यात आली आहे़ आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात आदिवासींची संख्या तिप्पट आहे़ जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या १ लाख २० हजार ७४५ आहे. यात पुरूष ६१ हजार ४१ व महिला ५९ हजार ७०५ आहेत. तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या तिप्पट म्हणजे ४ लाख ५३ हजार ३०६ आहे. पुरूष २ लाख ७ हजार ३७७ व महिलांची लोकसंख्या २ लाख ७ हजार ९२९ आहे. असे नमुद करण्यात आले आहे.
बालकांचा जन्मदर घटला
२०११ च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार बालकांच्या जन्मदरात घट झाली आहे़ २००१ च्या जनगणनेत १ लाख ५४ हजार ७४४ बालके होती़ यात ७८ हजार ७२४ मुले आणि ७६ हजार २० मुलींचा समावेश होता़ २०११ च्या जनगणनेनुसार बालकांची संख्या १ लाख १५ हजार १०४ आहे़ यात ५८ हजार ८४२ मुले व ५६ हजार २६२ मुलींचा समावेश आहे़ ग्रामीण भागात ५२ हजार ७९४ मुले व ५० हजार ७०९ मुली अशी एकू १ लाख ३ हजार ५०३ बालके आहे़ शहरी भागात ६ हजार ४८ मुले व ५ हजार ५५३ मुली अशी एकूण ११ हजार ६०१ बालके आहेत़