वृक्ष लागवडीसाठी जनजागृती
By admin | Published: June 30, 2016 01:37 AM2016-06-30T01:37:28+5:302016-06-30T01:37:28+5:30
दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी ठिकठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे.
एटापल्लीत मोटारसायकल रॅली : मानापुरात मार्गदर्शन कार्यक्रम
एटापल्ली/मानापूर/देलनवाडी : दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी ठिकठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे. या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता एटापल्ली येथे मोटारसायकल रॅली तर मानापूर येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एटापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी एच. जी. मडावी यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचाऱ्यांनी वन परिक्षेत्र कार्यालयापासून मोटारसायकल रॅली काढली. यावेळी एटापल्ली, टोला, जीवनगट्टा, कृष्णार आदी गावांतून फिरविण्यात आली. वन परिक्षेत्र कसनसूर अंतर्गत १ हजार झाडे लावण्याची उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने लोकसहभागातून खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात आले. कसनसूर, रोपी, कसूरवाही, हनपायली, सरखेडा, दिंडवी, पैडी आदी गावांमध्ये खड्डे खोदण्यात आले. परंतु वृक्ष लागवड झाल्यानंतर वृक्ष संवर्धनाकरिता संरक्षक कठडे लावण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे तालुक्यात लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जीवंत राहणार, ही चिंतेची बाब आहे.
देलनवाडी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत गावागावांत ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तांडे, पाडे, वस्त्यांमध्ये वृक्ष लागवडीबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. वृक्ष लागवड जनजागृती करण्याच्या हेतूने मानापूर येथे विवेकानंद विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनपाल मसराम, सावसाकडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून वृक्ष लागवड कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)