योजनांची जनजागृती करणार
By admin | Published: June 5, 2017 12:43 AM2017-06-05T00:43:34+5:302017-06-05T00:43:34+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना सर्वत्र पोहोचविणार तसेच प्रत्येक विस्तारक पं. स. सर्कलमध्ये जाऊन बुथ मजबूत करणार आहेत.
विस्तारक योजना : आलापल्लीच्या पत्रकार परिषदेत खासदारांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना सर्वत्र पोहोचविणार तसेच प्रत्येक विस्तारक पं. स. सर्कलमध्ये जाऊन बुथ मजबूत करणार आहेत. वन बूथ, टेन युथ ही संकल्पना राबविली जाणार आहे, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
२९ मे ते १२ जून पर्यंत विस्तारक योजना चालणार आहे. यादरम्यान भाजप कार्यकर्ता प्रत्येक गावात पोहोचून शासनाच्या योजनांची माहिती देणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी दिली. भाजपचे प्रदेश प्रवक्ता विश्वास पाठक यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. काळा पैसा, रोजगार, विदेशी गुंतवणूक, परराष्ट्र धोरण याबाबत भाजप सरकारने सखोल कामगिरी केली आहे. त्याबरोबरच गावात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासह विविध सोयीसुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. केंद्र शासनाच्या वतीने ७०० दिवसांत १७ हजार गावांत वीज पोहोचविण्यात आली व वीज निर्मितीतही वाढ झाली. गॅस कनेक्शनही ग्रामीण भागात पोहोचविण्यात आले. यासोबतच गावात मूलभूत सोयी सुविधा पोहोचविण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे खासदारांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रकाश गेडाम, स्वप्नील वरघंटे, रवी नेलकुद्री, भारत खटी, विनोद अकनपल्लीवार, अब्बास बेग, जावेद अली, मुकेश नामेवार, डी. के. मेश्राम, प्रकाश अर्जुनवार, सूर्यकांत ठाकरे व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.