जिंजगावात सुरू झाली लोकबिरादरीची आरोग्य सेवा
By admin | Published: July 22, 2016 01:26 AM2016-07-22T01:26:40+5:302016-07-22T01:27:10+5:30
१९७३ मध्ये बाबा आमटे यांनी तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती.
तलावाच्या खोदकामातून गाव झाले समृद्ध
भामरागड : १९७३ मध्ये बाबा आमटे यांनी तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती. मागील ३८ वर्षांपासून या प्रकल्पामार्फत आरोग्यसेवेचे काम सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या आरोग्य सेवेचा विस्तार भामरागडच्या दुर्गम भागातही केला जात आहे. नुकतेच जिंजगाव येथे लोकबिरादरीचे नवे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, विलास मनोहर यांच्यासह जिंजगावचे सीताराम व्यंका मडावी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. जिंजगाव परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, म्हणून येथीलच एका तरूणांला डॉ. दिगंत आमटे यांच्या मार्गदर्शनात नर्सिंगची ट्रेनिंग देण्यात आली. हा तरूण आता जिंजगाव आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे.
जीर्णोद्धारानंतर जिंजगाव तलाव भरला तुडुंब
उन्हाळ्यात लोक बिरादरी प्रकल्पामार्फत या तलावाचे खोलीकाम करण्यात आले होते. पावसाळ्यात हा तलाव समुद्रासारखा भरला असून आगामी दोन वर्ष तरी या परिसरातील शेतकऱ्यांना तलावाच्या पाण्यावर दोन पीक घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती लोक बिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. गावात ७० शौचालय व बाथरूम तसेच ३० हजार लिटर क्षमतेची पाणीटाकी निर्माण व्हावी, अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी लोकसहभागातून या कार्याला मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे अनिकेत आमटे म्हणाले.