‘मेडीगड्डा’ प्रकल्पावर आज पोचमपल्लीत जनसुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:17 AM2017-09-27T00:17:17+5:302017-09-27T00:18:02+5:30
महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर होत असलेल्या या जनसुनावणीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच या प्रकल्पाला असलेला नागरिकांचा विरोध पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तेलंगणा सरकारच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोठ्या प्रकल्पामुळे तेलंगणातील हजारो हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्टÑातील हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. पण त्या विरोधाला न जुमानता या प्रकल्पाचे काम तेलंगणा सरकारने सुरूही केले आहे.
गोदावरील लवादानुसार महाराष्टÑातून वाहणाºया गोदावरी, प्राणहिता या नद्यांच्या पाण्यावर तेलंगणाचा हक्क असला तरी त्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. याशिवाय राज्य शासनाच्या वतीने रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र त्याला न जुमानता तेलंगणा सरकार मनमानी करून जनभावनेचा अनादर करीत आहे. तरीही राज्य शासनातील लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी कोणताही आक्षेप न घेता तेलंगणा सरकारच्या तालावर नाचत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या प्रकल्पात आपली शेतजमीन जाऊन गावेही उठविली जाणार हे समजल्यानंतर नागरिकांचा विरोध वाढू लागला. मोर्चेही काढण्यात आले. पण प्रशासनातील अधिकारी, राज्य सरकारचे प्रतिनिधी अशा कोणीच त्यांचा आवाज ऐकला नाही. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून सर्वकाही ‘सेट’ केल्याचे काही जाणकार सांगतात.
ंवरातीमागून घोडे कशासाठी?
कोणत्याही प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याआधीच प्रकल्पग्रस्त नागरिकांची जनसुनावणी घेऊन त्यांच्या अपेक्षा ऐकून घेऊन त्यांचे समाधान करणे, त्यांचा विरोध शांततेच्या मार्गाने शमविणे गरजेचे असते. पण मेडीगट्टा प्रकल्पाच्या बाबतीत मात्र पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे. जनभावनेचा आदर न करता आधीच भूमिपूजन कार्यक्रम उरकून सर्व कामे सुरू करण्यात आली. असे असताना आता जनसुनावणीची औपचारिकता पूर्ण करून ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचा प्रकार कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो.
फायदा काय? प्रशासनच अनभिज्ञ
या प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसणार आहे. त्यांना विस्थापित होण्यासोबतच त्यांची शेतजमिनही पाण्याखाली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचा वापर मात्र तेलंगणातील शेतकºयांना करता येणार आहे. प्रत्यक्षात किती शेतकºयांची किती जमीन या प्रकल्पात जाणार, महाराष्टÑातील किती हेक्टर शेतजमिनीला या प्रकल्पाचा फायदा होणार, धरणाची उंची किती राहणार, प्रकल्पग्रस्तांना मोबदला किती मिळणार, इतर काय फायदे मिळणार याबाबत महाराष्टÑ शासनाच्या संबंधित यंत्रणांकडेही पुरेशी माहिती नाही. असे असतानाही जिल्हा प्रशासन यासंदर्भात तेलंगणाच्या हिताची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे. यासंदर्भात खरंच प्रशासनाकडे माहिती नाही, की प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.