वाढीव खाणपट्ट्यासाठी आज जनसुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 09:41 PM2022-10-26T21:41:58+5:302022-10-26T21:46:13+5:30
एटापल्ली हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि मागास तालुका म्हणून ओळखला जातो. पण सुरजागड खाणीमुळे या भागात रोजगाराला चालना मिळून नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. लॉयड्स मेटल्स कंपनीनेही रोजगारासोबत परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने रस्ते, सिंचन, शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मोफत उपचारासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचीही उभारणी केली जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोहखाणीची लिज मिळालेल्या ३४८.०९ हेक्टर क्षेत्रातून लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीला खनिज उत्खननाची मर्यादा ३ दशलक्ष मे. टन प्रतिवर्ष वरून १० दशलक्ष टन प्रतिवर्ष करण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी (दि.२७) जनसुनावणी घेतली जाणार आहे. कोनसरी येथे उभारल्या जात असलेल्या लोहप्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या जनसुनावणीत नागरिक रोजगाराला आणि परिसराच्या विकासाला चालना देणाऱ्या उद्योगाच्या बाजूने कौल देणार की विरोध करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात दुपारी १२ वाजता सुरू होणाऱ्या या जनसुनावणीसाठी बाधित होणाऱ्या १३ गावांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत. आपले म्हणणे मांडू इच्छिणाऱ्या गावातील इच्छुक नागरिकांना बुधवारीच गडचिरोलीत आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आम्हाला विस्थापित न होता रोजगार मिळत असेल, आरोग्य व इतर सुविधा उपलब्ध होत असेल तर आम्ही विरोध का करू? असा प्रश्न जनसुनावणीसाठी आलेल्या काही नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
ही जनसुनावणी एटापल्लीत घ्यावी अशी मागणी काही जनप्रतिनिधींनी केली. पण नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असल्याने सुरक्षेच्या कारणावरून त्यासाठी परवानगी मिळाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या सुनावणीत स्थानिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले आहे.
मोठ्या प्रमाणात लोहखनिज असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात केंद्र शासनाने २००६ मध्ये अनेक कंपन्यांना लिज मंजूर केली. परंतु केवळ लॉयड्स मेटल्स कंपनीने अनेक अडचणींना तोंड देत प्रत्यक्ष लोहखनिज काढण्याचे काम सुरू करण्याची हिंमत केली. आता कोनसरी येथे उभ्या होत असलेल्या लोहप्रकल्पाचा पहिला टप्पा सहा महिन्यात सुरू होणार आहे. हजारो कुशल व अकुशल व्यक्तींना प्रत्यक्ष काम देण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पासारखे लोहप्रकल्प पूर्व विदर्भात इतरही ठिकाणी निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
एटापल्ली तालुक्याला मिळणार नवीन ओळख
एटापल्ली हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि मागास तालुका म्हणून ओळखला जातो. पण सुरजागड खाणीमुळे या भागात रोजगाराला चालना मिळून नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. लॉयड्स मेटल्स कंपनीनेही रोजगारासोबत परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने रस्ते, सिंचन, शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मोफत उपचारासाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचीही उभारणी केली जात आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्याची नवीन ओळख मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
प्रकल्पबाधित १३ गावांसाठी विकास आराखडा
- जनसुनावणीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी ग्रामपंचायतअंतर्गत पाच गावे, तोडसा ग्रामपंचायतअंतर्गत पाच गावे आणि नागुलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तीन अशी १३ बाधित गावांतील नागरिक येणार आहेत. बांडे, मल्लपाड, मंगेर, परसलगोंदी, सुरजागड, हेडरी, इकारा, करमपल्ली, पेठा, झारेगुडा, कुदारी, नागुलवाडी, मोहुर्ली ही गावे लोहप्रकल्पामुळे बाधित होत आहेत. त्यामुळे यावर नागरिकांची भावना जाणून घेण्यासाठी ही जनसुनावणी ठेवली आहे. सदर गावांत प्रत्येक कुटुंबात एका व्यक्तीला रोजगार मिळून मूलभूत विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्या माध्यमातून या गावांचे रूप पालटणार असल्याची माहिती लाॅयड्स मेटल्सच्या वतीने देण्यात आली.
जनसुनावणी एटापल्लीतच घ्या
सुरजागड लोहखाणीच्या वाढीव उत्खननाच्या प्रस्तावावरील दि.२७ ला होणारी जनसुनावणी रद्द करून ती गडचिरोलीऐवजी एटापल्ली येथेच घ्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नियमानुसार आणि जनतेच्या सोयीसाठी एटापल्लीत जनसुनावणी ठेवणे गरजेचे होते. पण गडचिरोलीत सुनावणी ठेवल्याने नागरिक जनसुनावणीपासून वंचित राहू शकतात असे सांगत त्यांनी खराब झालेल्या रस्त्यांकडेही उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.