Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत उद्योगाला चालना केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:27 AM2019-04-04T00:27:58+5:302019-04-04T13:07:56+5:30
वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही. परिणामी युवक व सामान्य नागरिकांना रोजगारासाठी कधी छत्तीसगड तर कधी तेलंगणा राज्यात जावे लागते. असे असताना हा मुद्दा कोणत्याच निवडणुकांमध्ये फारसा चर्चेचा विषय ठरत नाही.
जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ७६ टक्के भागावर जंगल आहे. सिंचनाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. मात्र हे सर्व प्रकल्प वन कायद्याच्या कचाट्यात अडकले. मिळालेली परवानगी वन कायद्यानंतर रद्द करण्यात आली. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे एखाद्या होतकरू तरूणाने आधुनिक शेती करायची ठरवले तरी त्याच्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे समोरचे संपूर्ण नियोजन फेल ठरते. थोडीफार रोजगार शेतीच्या माध्यमातून निर्माण होतो, मात्र सिंचनाअभावी येथील शेती बेभरवशाची बनली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बांबू व सागाचा दर्जा अतिशय चांगला आहे. बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तूंना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर चांगली मागणी आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करता येणे शक्य आहे. मात्र बांबूपासून मोठ्या प्रमाणात वस्तू तयार होतील व हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असा प्रयत्न आजपर्यंत झाला नाही. परिणामी लाखमोलाचा बांबू जंगलातच सडत आहे. तेलंगणातील तस्करांची येथील सागवानावर नेहमीच नजर असते. गोदावरी, प्राणहिता नदी पार करून सागवानाची चोरी केली जाते. त्यातून लाखो रूपयांची उलाढाल होते. मात्र आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सागवानापासून चांगल्या वस्तू निर्माण होतील.
स्थानिक स्तरावर जी संसाधने उपलब्ध आहेत, त्यानुसार रोजगार निर्मितीचा प्रयत्न शासनामार्फत केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात जंगल अधिक आहे. त्यमुळे जंगलावर आधारित उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात असे घडले नाही. परिणामी जंगलामुळेच आपला विकास रखडला, अशी चुकीची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
- रामू मादेशी,
सामाजिक कार्यकर्ते, आलापल्ली
आजपर्यंतच्या राजकीय व्यक्तींनी रोजगार निर्मितीबाबतचे केवळ पोकळ आश्वासन देण्याचे काम केले आहे. मात्र प्रत्यक्षात रोजगार निर्मिती झाली नाही. अजुनही येथील युवकांना रोजगारासाठी तेलंगणा, छत्तीसगड राज्य गाठावे लागते. बांबू, सागवान लाकूड यांच्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करता येऊ शकेल, असे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
- आकाश बोबाटे, बेरोजगार युवक, इंदिरानगर, गडचिरोली