...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा 

By संजय तिपाले | Published: December 21, 2023 05:07 PM2023-12-21T17:07:47+5:302023-12-21T17:09:13+5:30

तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

public will not forgive naxalites warn minister atram from todgatta movement gadchiroli | ...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा 

...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा 

संजय तिपाले,गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे खाणविरोधी आंदोलन उधळून लावल्यानंतर संतापलेल्या नक्षल्यांनी पोलिस खबरी असल्याच्या संशयावरुन तीन निष्पाप नागरिकांची हत्या केल्यानंतर २१ डिसेंबरला पत्रक जारी केले. यात थेट अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे.

छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे दमकोंडवाहीच्या प्रस्तावित लोहखाणींना विरोध करत २५० दिवसांपासून आंदोलन सुरु होते. तेथून जवळच असलेल्या वांगेतुरी येथे २० नोव्हेंबरला पोलिसांनी मदतकेंद्र स्थापन केले. यावेळी आंदोलन व पोलिस आमने- सामने आले. यानंतर पोलिसांनी आंदोलन उधळून लावले. दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीला ११ जून रोजी धर्मरावबाबा आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन खाणविरोधी भूमिकेला समर्थन दिले होते. मात्र, नंतर सत्तानाट्यात त्यांना मंत्रिपद मिळाले. आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला, २१ जणांना ताब्यात घेतले. मात्र, मंत्री आत्राम हे मौन धारण करुन बसले आहेत. आता मंत्री आत्राम यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकाद्वारे केले आहे.

मंत्री आत्राम यांनी कॉर्पोरेट घराण्यांच्या हितासाठी धारण केलेले मौन योग्य नाही, त्यांनी मौन सोडावे. मंत्रिपद केवळ आठ महिन्यांसाठीच आहे. यासाठी जनतेची परीक्षा पाहू नये अन्यथा जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्रीनिवास याने दिला आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलिसांवरील आरोप फेटाळून लावले. या पत्रकाचे विश्लेषण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

बोदीनटोला चकमकीचा निषेध :

बोदीनटोला (ता.धानोरा) येथे १४ डिसेंबरला दोन नक्षल्यांचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला होता.याचा उल्लेख करत या पत्रकात पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित करुन निषेध नोंदविला आहे. १४ डिसेंबरला पोलिस व नक्षल्यांत चकमक झाली होती. यात जहाल नक्षलवादी दुर्गेश वट्टे व राकेश हे दोघे ठार झाले होते. चार वर्षांपूर्वी जांभुळखेडा येथील स्फोटात १५ पोलिस शहीद झाले होते. या स्फोटाचा दुर्गेश वट्टे हा मास्टरमाईंड होता. तथापि, नक्षल्यांनी स्वतंत्र पत्रक काढून मृत दोन नक्षल्यांची पार्श्वभूमी विषद केली आहे.

या जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.  या पत्रकाला मी महत्त्व देत नाही. या भागाचा विकास करणे याला मी प्राधान्य देतो.- धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन

Web Title: public will not forgive naxalites warn minister atram from todgatta movement gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.