पंचनामा केला, मात्र रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:43+5:30
सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांची संख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याने इमारत बांधकाम कंत्राटदारांचा अवैध मार्गाने प्राप्त होणाऱ्या रेतीवर भर आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास नदी पात्रातून रेतीचे अवैधरित्या खणन करून त्याची ट्रॅक्टरने वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली (गोलागुड्डम माल) येथील पुलाच्या बांधकामासाठी अवैधरित्या रेती नेणाऱ्या ट्रॅक्टरचा तलाठ्यांनी पंचनामा केला. मात्र संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली नाही. हा प्रकार अलिकडेच उघडकीस आला आहे.
सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांची संख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याने इमारत बांधकाम कंत्राटदारांचा अवैध मार्गाने प्राप्त होणाऱ्या रेतीवर भर आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास नदी पात्रातून रेतीचे अवैधरित्या खणन करून त्याची ट्रॅक्टरने वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली येथे गेल्या काही महिन्यांपासून पुलाच्या कामासाठी सिमेंट काँक्रीटला लागणारी रेती अवैधरित्या आणली जात आहे. शेकडो ब्रास रेती अवैध मार्गाने या कामात वापरली जात असल्याचे दिसून येते. संबंधित साजाच्या तलाठी प्रविण डोंगरे यांनी घटनास्थळी जाऊन १६ ब्रास रेतीचा पंचनामा केला. मात्र संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली नाही. याचा फायदा पुलाचे बांधकाम करणारी कंपनी घेत आहे. या भागात दररोज टिपरने नदी पात्रातून रेतीची तस्करी केली जात आहे. मात्र याकडे तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकार थांबविण्यासाठी चौकशी करून धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडाला
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली ते पातागुड्डम महामार्गाच्या कामासाठी आसरअल्ली वन परिक्षेत्राच्या हद्दितील रेती, गिट्टी, दगडाची अवैधरित्या तस्करी करून ते वापरण्यात आले. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडाला. मार्गाचे काम करणाºया संबंधित कंपनीने शासनाला चूना लावला.