जिल्ह्यात धान बांधणीनंतर पंचनामे; खरच मदत मिळणार का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 05:00 AM2021-11-22T05:00:00+5:302021-11-22T05:00:39+5:30
यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस काेसळत आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामा करणारे पथक धानाची बांधणी झाल्यानंतर शेतात पाेहाेचत आहे. बांधणी झाल्यामुळे शेतात झालेेले नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची माेठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले हाेईल, अशी आशा शेतकरी बाळगून हाेते. मात्र ऐन धान कापणीच्या हंगामात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे. धानाच्या कळपा पाण्यावर तरंगत आहेत. सखल भागात असलेल्या शेतात तीन ते चार दिवसांपासून पाणी वाहत असल्याने धान पिक बांधीतच कुजण्याचा धाेका आहे.
पावसामुळे तांदूळ काळा पडत असल्याने या धानाला फारसा भाव मिळत नाही.
नुकसानीचा सर्व्हे अगदी वेळेवर हाेणे आवश्यक हाेते. मात्र नुकसानीचा पंचनामा करणारे पथक शेतात उशिरा पाेहाेचत आहे. काही शेतकरी कळपांची बांधणी करून पुंजणे टाकत आहेत. शेतात पथक पाेहाेचल्यानंतर नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे नुकसान न झाल्याचा शेरा लावला जात असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याचा धाेका निर्माण झाला आहे.
पावसाचा जाेर सुरूच
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर सुरू आहे. अधून-मधून पाऊस पडत असल्याने धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी व बांधणीची कामे लांबणीवर टाकली आहेत. धान पिकाच्या बांधणीचे काम लांबल्यास तांदळाची क्वालिटी बिघडत असल्याने फारसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
धानाला याेग्य भाव मिळणे कठीण
पावसाने धान भिजल्यानंतर तांदूळ काळा पडते. या धानाला अतिशय कमी प्रमाणात भाव मिळते. यावर्षी धानाला शासनाने बाेनस अजूनही जाहीर केला नाही. परिणामी बहुतांश धान खासगी व्यापाऱ्यालाच विकावा लागणार आहे. अशातच धानही खराब झाल्याने धानाला अतिशय कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.