पत्नीला जाळणाऱ्या पतीस शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:27 PM2018-05-05T23:27:09+5:302018-05-05T23:27:09+5:30
दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लालाजी पुंडलिक सोरपे रा. मौशीखांब, ता. गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे.
ही घटना २७ आॅक्टोबर २०१६ ची आहे. या दिवशी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आरोपी लालाजी सोरपे याने पत्नीला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे लालाजीने पत्नी स्वयंपाक करीत असताना तिच्यावर केरोसीन ओतून पेटते कोलीत तिच्या अंगावर फेकले. यामुळे ती ४५ टक्के जळाली. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान तिचे बयाण घेण्यात आले. या बयाणाच्या आधारे आरोपी लालाजी सोरपे याच्यावर आरमोरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम साखरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी आरोपी लालाजी सोरपे यास भारतीय दंड विधानचे कलम ३०७ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.
कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.