२ लाख १३ हजार क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2016 02:28 AM2016-12-31T02:28:45+5:302016-12-31T02:28:45+5:30
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत
७४ केंद्रांवर धानाची आवक : मंजुरी मिळूनही १३ केंदे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत; दुर्गम गावांतील शेतकऱ्यांची अडचण
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत आतापर्यंत ३१ कोटी ४१ लाख १८ हजार ९१९ रूपये किंमतीच्या २ लाख १३ हजार ६८६ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात ७४ केंद्रांवर धानाची आवक सुरू झाली असून मंजुरी मिळूनही सहकारी संस्थांचे १३ केंद्र सुरू करण्यात आले नाही.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात एकूण ५८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ५१ केंद्र सुरू झाले असून या केंद्रावर धानाची आवक सुरू झाली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत यंदाच्या हंगामात एकूण ३१ केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी २५ केंद्र सुरू झाले असून २३ केंद्रांवर धानाची आवक सुरू आहे. गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालये मिळून एकूण ८९ केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून सुरू झालेल्या ७६ केंद्रांपैकी ७४ केंद्रांवर धानाची आवक सुरू झाली आहे.
गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत असलेल्या सहकारी संस्थांच्या ५१ धान खरेदी केंद्रांवरून २४ कोटी ५ लाख ९१ हजार ७२४ रूपये किंमतीच्या १ लाख ६३ हजार ६६७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सहकारी संस्थांच्या २३ केंद्रांवरून आतापर्यंत ७ कोटी ३५ लाख २७ हजार १९५ रूपये किंमतीच्या ५० हजार १८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालय मिळून एकूण ७४ केंद्रांवरून जिल्ह्यात ३१ कोटी ४१ लाख १८ हजार ९१९ रूपये किंमतीच्या २ लाख १३ हजार ६८६ क्विंटल धानाची खरेदी आतापर्यंत झाली आहे.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत पलसगड, गोठणगाव, देऊळगाव, वडेगाव, गेवर्धा, सोनसरी, घाटी, कढोली, आंधळी व कुरखेडा तर कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मसेली, कोरची बेतकाठी, बोरी, मर्केकसा, बेडगाव, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा व खोब्रामेंढा या १० केंद्रांना मंजुरी देण्यात आली. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत अंगारा, उराडी, देलनवाडी, दवंडी, कुरंडी माल, पिंपळगाव, मौशीखांब व चांदाळा आदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली.
धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मोहली, धानोरा, सावरगाव, सुरसुंडी, रांगी, सुळे, चातगाव, मुरूमगाव, दुधमाळा, कारवाफा, गट्टा, पेंढरी आदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मक्केपल्ली, रेगडी, घोट, आमगाव, मार्र्कंडा (क.), अड्याळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी, गिलगाव आदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. दुर्गम भागात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तालुकास्तरावर धान विक्री करावी लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)