सीमावर्ती आसरअल्लीचे धान खरेदी केंद्र दोन दिवसातच बंद
By Admin | Published: December 31, 2015 01:37 AM2015-12-31T01:37:26+5:302015-12-31T01:37:26+5:30
तेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने ...
तालुक्यासाठी दिला एकच ग्रेडर : शेतकऱ्यांना रात्र काढावी लागते थंडीत
श्रीकांत सुगरवार आसरअल्ली
तेलंगण राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिसरातील शेतकरी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने प्रचंड अडचणीत आले असून या प्रश्नाला घेऊन ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी जाहीर केला आहे.
आसरअल्ली येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. फक्त दोनच दिवस धान खरेदी करण्यात आली. धान खरेदी करण्यासाठी सिरोंचा तालुक्याला फक्त एकच ग्रेडर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हे खरेदी केंद्र बंद पडून आहे. केंद्र सुरू होताच परिसरातील शेतकऱ्यांनी आपले हजारो क्विंटल धान मार्केटमध्ये आणले व केंद्र बंद झाल्यावर आता शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत धान पोत्यांची रखवाली करीत बाजार ठिकाणीच रात्र काढावी लागत आहे.
अंकिसा येथील खरेदी केंद्रही बंद
अंकिसा येथे गोदामाअभावी अजूनपर्यंत हमीभाव धान खरेद केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. आसरअल्ली व अंकिसा येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना सांगितले की, यंदा उतारा घटला असून खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.
५ जानेवारीपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास आसरअल्ली, अंकिसा परिसरातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेतील, अशी माहिती गजानन कलाक्षपवार, नागीरेड्डी गुडीमेटला, पापय्या पाले, वेंकटेश्वर इनगंटी, अब्दुल गणी, शेख वाहिद यांनी दिली.
यंदा उतारा घटला
गेल्या वर्षी एका एकरात १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पन्न झाले होते. परंतु यावर्षी एका एकरात केवळ ८ क्विंटल धान झाले आहे. नापिकी व कमी उत्पादन यातच शासनाचे खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याच्या दारात आपला माल विकासाठी जावे लागत आहे. खासगी व्यापारी/सावकार शेतकऱ्यांची प्रचंड लूट करीत असून काही व्यापाऱ्यांनी तर शेतकऱ्यांना कर्जाऊ दिलेली रक्कमही मालाच्या विक्रीतूनच कापण्याचा सपाटा लावला आहे.