८६ केंद्रांवरून नऊ लाख क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:45 AM2019-03-17T00:45:16+5:302019-03-17T00:45:59+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या चालू वर्षातील खरीप हंगामात १५ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्हाभरातील ८६ केंद्रांवरून एकूण ९ लाख २ हजार ८८२ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली असून या धानाची एकूण किंमत १५८ कोटी रुपये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या चालू वर्षातील खरीप हंगामात १५ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्हाभरातील ८६ केंद्रांवरून एकूण ९ लाख २ हजार ८८२ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली असून या धानाची एकूण किंमत १५८ कोटी रुपये आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ तर अहेरी कार्यालयांतर्गत ३५ अशा एकूण ८६ केंद्रांवरून जिल्हाभरात धानाची खरेदी सुरू आहे. महामंडळाच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी सुरू असून साधारण प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ७५० रुपये इतका हमीभाव दिला जात आहे. महामंडळाच्या सर्वच केंद्रावर साधारण धानाचीच आवक झाली आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५१ केंद्रांवर १५ मार्चपर्यंत एकूण ६ लाख ४९ हजार ३३७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३५ केंद्रावरून ४४ कोटी ३७ लाख रुपये किमतीच्या २ लाख ५३ हजार ५४४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. महामंडळाच्या केंद्रावर जिल्ह्यातील एकूण ३० हजार २७१ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धानाची विक्री केली आहे. यामध्ये १३ हजार ५४५ आदिवासी व १६ हजार ७२६ गैरआदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत कढोली, नान्ही, गोठणगाव, गेवर्धा, आंधळी, देऊळगाव, सोनसरी, खरकाडा, पलसगड आदी १० केंद्रांवरून एकूण २५ कोटी ८७ लाख २६ हजार रुपये किमतीच्या १ लाख ४७ हजार ८४३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मसेली, बेतकाठी, कोरची, मरकेकसा, कोटरा, कोटगूल, रामगड, पुराडा, खेडेगाव, येंगलखेडा, मालेवाडा आदी १३ केंद्रांवरून एकूण १ लाख ५८ हजार ३७४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची एकूण किंमत २७ कोटी ७१ लाख ५४ हजार ८३२ रुपये इतकी आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत देलनवाडी, कुरूंडी माल, दवंडी, उराडी, अंगारा, पिंपळगाव, मौशीखांब, पोटेगाव, विहीरगाव आदी नऊ केंद्रांवरून १ लाख ३२ हजार ६५६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची किंमत २३ कोटी २१ लाख ४८ हजार ९६२ रुपये आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मुरूमगाव, रांगी, दुधमाळा, धानोरा, कारवाफा, पेंढरी, मोहली, सुरसुंडी व सोडे आदी नऊ केंद्रांवरून ९६ हजार ८३९ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत १६ कोटी ९४ लाख ७१ हजार ८५५ रुपये इतकी आहे. घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मकेपल्ली, रेगडी, घोट, गुंडापल्ली, भाडभिडी, अड्याळ, सोनापूर, आमगाव, गिलगाव, मार्र्कंडा क. आदी १० केंद्र आहेत. या केंद्रांवरून एकूण १ लाख १३ हजार ६२२ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.
४१ कोटींचे धान चुकारे प्रलंबित
आदिवासी विकास महामंडहाच्या वतीने गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या एकूण २२ हजार २७६ शेतकऱ्यांना ११.६९ कोटी रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्यापही ४१ कोटी ५ लाख ९१ हजार ३१७ रुपयाचे चुकारे देणे शिल्लक आहे. महामंडळाच्या केंद्रांवर धानाची विक्री करूनही चुकाºयाची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेकडो शेतकरी अडचणीत आले आहेत. महामंडळ व आविका संस्थेच्या वतीने चुकारे अदा करण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बरेच शेतकरी खासगी व्यापाºयांना धानाची विक्री करून नगदी रक्कम घेतात.