नान्ही व आंधळीतील धान खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:13 AM2018-01-20T01:13:14+5:302018-01-20T01:19:31+5:30
धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली असून खरेदी केलेल्या मालाची तत्काळ उचल करून गोदाम रिकामा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उघड्यावर धान ठेवल्याने वेळेवर पाऊस आल्यास धान भिजून मोठ्या प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाचे यापूर्वी नुकसान झाले आहे. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी ज्या संस्थेकडे धान साठवणूक करण्यासाठी गोदामाची व्यवस्था आहे किंवा संस्थेच्या प्रांगणात ओट्याचे बांधकाम केले आहे. अशा संस्थांनाच धान खरेदीची परवानगी दिली आहे.
नान्ही व आंधळी येथील संस्थांकडे गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे या संस्थांनी ओट्याचे बांधकाम करून खरेदी सुरू केली. दोन्ही संस्थांनी प्रत्येकी जवळपास पाच हजार क्विंटल धान खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने भरडाईसाठी उचल केली नाही. त्यामुळे सदर धान खरेदी केंद्राच्या आवारातच ताडपत्री झाकून पडून आहे. ओट्याचीही साठवणूक क्षमता संपल्याने धान खरेदी करू नये, अशा सूूचना आदिवासी विकास महामंडळाने संस्थेला दिल्या असल्याने या सूचनांनुसार संस्थेने मागील आठवडाभरापासून धान खरेदी बंद पडली आहे. शेतकऱ्यांच्या धानाची मळणी पूर्ण झाली आहे. खरीपासाठी घेतलेले कर्ज मार्च महिन्याच्यापूर्वी परत करावे लागणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धान आणण्यास सुरूवात केली आहे. मात्र धान खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे धान वजन न करताच ठेवले जात आहे. वेळेवर पाऊस आल्यास धानाची मोठी नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.
हजारो क्विंटल धान उघड्यावर
गोदाम नसल्याने नान्ही व आंधळी या दोन्ही संस्थांनी धान खरेदी आठवडाभरापासून बंद ठेवली आहे. मात्र याची माहिती ग्रामीण भागातील शेतकºयांना नाही. त्यामुळे शेतकरी बैैलबंडीने धान खरेदी केंद्रावर आणत आहेत. मागील आठ दिवसांत हजारो क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने धानाची उचल करून ओटे मोकळे करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.