्रपशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:04 AM2017-12-18T00:04:55+5:302017-12-18T00:05:07+5:30
राज्यभरात सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यभरात सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शासनाने सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची पदे भरावी या मुख्य मागणीसाठी सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, पशुवैद्यकीय दवाखाण्याच्या मंजूर ढाचाप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ वर संस्थाप्रमुख म्हणून सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक व एक परिचर ही दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे १० ते १५ गावांचा व्याप आहे. आजारी जनावरांना पशुवैद्यकीय सेवा द्यावी लागते. त्याचबरोबर पशुसंवर्धन विषयक सेवाही द्याव्या लागतात. एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन दवाखान्यांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. हा सर्व व्याप सांभाळताना पशुधन अधिकाºयांची चांगलीच दमछाक उडत आहे. त्यामुळे पशुधन अधिकाऱ्यांची पदे भरावी, सहायक पशुधन विकास अधिकारी ते पशुधन विकास अधिकारी गट-ब पदोन्नती द्यावी, ग्रामसेवक, कृषी सहायकांप्रमाणे दरमहा प्रवास भत्ता मंजूर करावा, राज्य स्तरावरील पशुधन पर्यवेक्षक ते सहायक पशुधन विकास अधिकारी पदावर पदोन्नती द्यावी, खात्याच्या पुनररचनेसंदर्भात संघटनेने दिलेल्या प्रस्तावानुसार सुधारणा करावी, बारावीनंतर तीन वर्षांचा पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करावा, राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांची पहिली व दुसरी कालबद्ध पदोन्नती मंजूर करावी आदी मागण्यांंचा समावेश आहे. याच मागण्यांसाठी यापूर्वी १५ मे २०१७ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन मंत्री यांची भेट घेवून चर्चा केली होती. मागण्या माण्य करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. संघटनेच्या वतीने यानंतर राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी जिल्हाभरातील सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.