जांभळी रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:38 AM2021-04-09T04:38:31+5:302021-04-09T04:38:31+5:30
रांगी : येथून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभळी गावाकडे जाणाऱ्या सहा किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण झाले नसल्याने ...
रांगी : येथून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभळी गावाकडे जाणाऱ्या सहा किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण झाले नसल्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
जांभळी गावाचा समावेश आरमोरी तालुक्यात होतो. येथील नागरिकांनी नियमित रांगी येथे दैनंदिन कामाकरिता येत असतात. कधी आठवडी बाजार तर कधी बँकेचे काम नागरिकांना असते. याशिवाय शाळा-महाविद्यालय व अन्य कामाकरिता विद्यार्थीही नियमित येतात. विशेष म्हणजे, या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी खडीकरणाचे काम करण्यात आले. त्यानंतर काही वर्षात रस्ता पूर्ण उखडला. येथे मुरूम टाकणे आवश्यक होते; परंतु याकडे दुर्लक्ष झाले. सदर मार्ग वर्दळीचा असल्याने डांबरीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
जांभळीकडे जाणाऱ्या सहा किमी मार्गाचे डांबरीकरण झाल्यास परिसरातील नागरिकांना रांगीकडे ये-जा करणे सोयीचे होऊ शकते. पावसाळ्यात सदर रस्त्यावरून चिखल पसरतो. त्यामुळे आवागमन करताना अडचणी येतात. जागोजागी गिट्टी उखडली असल्याने दुचाकी वाहने पंक्चर होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सहा किमी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी जांभळीवासीयांनी अनेकदा केली; परंतु दुर्लक्षच झाले.