जांभळी मार्गाची ४६ वर्षांपासून दुरुस्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:39 AM2021-08-22T04:39:19+5:302021-08-22T04:39:19+5:30
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील जांभळी - दवंडी - रांगी या रोडवरील जुने खडीकरण पूर्णत: उखडले असल्याने वाहनधारक व नागरिकांना ...
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील जांभळी - दवंडी - रांगी या रोडवरील जुने खडीकरण पूर्णत: उखडले असल्याने वाहनधारक व नागरिकांना त्रास हाेत आहे. त्यामुळे या मार्गाचे नव्याने खडीकरण करावे, अशी मागणी जांभळीवासीयांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर धानोरा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जांभळी - दवंडी - रांगी या रोडचे १९७६ मध्ये तुलतुली प्रकल्पाकरिता खडीकरण करण्यात आले होते. तुलतुली प्रकल्पात वन विभागाची आडकाठी आल्यामुळे हा प्रकल्प रखडला. दुसरीकडे ४६ वर्षांपासून जांभळी - दवंडी - रांगी हा मार्ग खडीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावर साधे मुरूमही टाकण्यात आले नाही. या रस्त्यावरील जुने खडीकरण पूर्णत: उखडले असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत.
या मार्गाने रांगी येथे बाजार व इतर कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी घेऊन अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, स्थानिक आमदार व जिल्हा परिषद सदस्यांनादेखील निवेदने देऊन झाली. मात्र अजूनपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्ता खडीकरण करण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील नागरिकांवर मोठा अन्याय होत आहे. एक महिन्यामध्ये खडीकरण न झाल्यास येत्या १० सप्टेंबर २०२१ ला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा जांभळी येथील नागरिकांनी दिला आहे.