आजपासून प्राणहितेच्या तीरावर पुष्कर मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:00 AM2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:26+5:30

प्राणहिता नदीत स्नान केल्यानंतर भाविक नदीपलीकडे तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध कालेश्वरम मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. येणाऱ्या भाविकांना नदीकाठावर आणि नदीपात्रात आंघोळीला जाण्यासाठी प्रशासनाकडून विविध सोयी करण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी नदीघाटावरील जागा तयार करणे, स्वच्छतागृह तयार करणे, पाण्याची व्यवस्था, लाइटची व्यवस्था, तसेच इतर आवश्यक नियोजनासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

Pushkar Mela on the shores of Pranhite from today | आजपासून प्राणहितेच्या तीरावर पुष्कर मेळा

आजपासून प्राणहितेच्या तीरावर पुष्कर मेळा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर प्राणहिता नदीतीरावर दर १२ वर्षांनी भरणाऱ्या पुष्कर मेळाव्याची सुरुवात बुधवारपासून (दि.१३) होणार आहे. २४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात महाराष्ट्र, तेलंगणा तथा छत्तीसगड राज्यातील लाखो भाविक पवित्र स्नानासाठी येणार आहेत. 
प्राणहिता नदीत स्नान केल्यानंतर भाविक नदीपलीकडे तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध कालेश्वरम मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. येणाऱ्या भाविकांना नदीकाठावर आणि नदीपात्रात आंघोळीला जाण्यासाठी प्रशासनाकडून विविध सोयी करण्यात आल्या आहेत. 
भाविकांसाठी नदीघाटावरील जागा तयार करणे, स्वच्छतागृह तयार करणे, पाण्याची व्यवस्था, लाइटची व्यवस्था, तसेच इतर आवश्यक नियोजनासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी तेलंगणा प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करण्यात आले. मंदिर व्यवस्थापकांशी संवाद साधून भाविकांचा येण्याजाण्याचा मार्ग निश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
यापूर्वी सन २०१० साली झालेल्या पुष्कर मेळाव्यात तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सिरोंचा येथे पूल नव्हता. आता येण्या-जाण्यासाठी पुलाची व्यवस्था असल्याने, सिरोंचाकडे जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. साधारण ५ लाख भाविक येतील, या हिशेबाने सदर मेळाव्याचे नियोजन केले आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. त्या अनुषंगाने आवश्यक सुविधा निर्मितीसाठी त्या निधीची मदत झाली. यात्रा संपेपर्यंत आवश्यक त्या साेयी केल्या जाणार आहेत.

पालकमंत्री एकनाथ शिंदे आज सिरोंचात

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पुष्कर मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी हजर राहतील. हेलिकॉप्टरने सिरोंचात आल्यानंतर सिरोंचा घाट येथत्ते भेट देतील. त्यानंतर गडचिरोलीमार्गे सायंकाळी नागपूरकडे रवाना होतील.

पुष्करनिमित्त जिल्ह्यातील पर्यटनाला चालना

वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पर्यटकांना पाहण्यासारखी ८० हून अधिक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पुष्कर मेळ्याच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांना या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांनाही भेटी देता येणार आहे. यात प्रामुख्याने आष्टी येथील शेकरू पार्क, आलापल्ली-अहेरी येथील वनवैभव, जवळच असलेला कमलापूर हत्ती कॅम्प, सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा धबधबा, पुष्करजवळ असलेले डायनासोर फॉसिल पार्क, सिरोंचा येथून जवळच असलेला सोमनूर त्रिवेणी संगम, तसेच तीन राज्यांची सीमा असलेले मध्यवर्ती ठिकाण, सिरोंचा शहरातील दीडशे वर्ष जुने शासकीय विश्रामगृह याव्यतिरिक्त अहेरीहून भामरागड, तसेच हेमलकसा येथील डाॅ. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प ही ठिकाणंही पर्यटकांना पाहता येणार आहे. जाताना वाटेत चपराळा अभयारण्यही लागते.

 

Web Title: Pushkar Mela on the shores of Pranhite from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन