इंद्रावती नदीत सागवानाचे पुष्पास्टाईल डम्पिंग; वन अधिकाऱ्यांनी असं पकडलं
By गेापाल लाजुरकर | Published: August 27, 2023 09:26 PM2023-08-27T21:26:44+5:302023-08-27T21:27:17+5:30
साडेसात घनमीटर लाकूड : चोरट्या वाहतुकीसाठी साठवणूक
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील व महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या इंद्रावती नदीतून तस्करी करण्याच्या हेतूने सागवान लाकूड डम्पिंग केला होता. ही गोपनीय माहिती झिंगानूर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी शोधमोहीम राबवून पाच लाख रुपये किमतीचा साडेसात घनमीटर माल जप्त करण्यात आला.
छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत इंद्रावती नदीत तराफे बांधून सागवान लाकूड डम्पिंग केला होता. ही माहिती झिंगानूर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सर्व वनकर्मचारी व वनमजूरांनी २४ ऑगस्ट रोजी नदीच्या काठाने व पाण्याने भरलेल्या नदीपात्रात उतरून शोधमोहीम सुरू केली. तेव्हा दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका ठिकाणी सागवानाचे १२ लठ्ठे व दुसऱ्या ठिकाणी सागवानाचे २० लठ्ठे आढळले. ही कारवाई वनपाल तुषार बेपारी, वनरक्षक तिरुपती शेडमेक, महेंद्र हिचामी, आशिष कुमरे, अशोक गोरगोंडा, सुधाकर महाका, तेनशिंग गोटा, खोजेंद्र आत्राम, विनोद गावळे, नितेश कोरेत, विजू मडावी, रामभाऊ जोरतोडे, मयुरी जुमनाके तसेच वनमजूर नीलेश मडावी, बक्का मडावी, श्रीकांत कोंडागोर्ला, सडवली मडावी, सुधाकर गावडे, सुभाष मडावी व महेंद्र कुमरी आदींनी केली.
सागवानाची रात्रभर केली राखण
२४ ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत सागवानाची शोधमोहीम राबविल्यानंतर रात्री त्याठिकाणी कर्मचाऱ्यानी मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवशी २५ ऑगस्ट रोजी सर्व साग लठ्ठे नदीतून तराफे बांधून कर्मचारी व वनमजुरांच्या सहाय्याने कोर्ला घाटातून काढले. यात एकूण ३२ साग लठ्ठे ७.५८८ घनमीटर माल आढळून आला. सदर सागवानाची किंमत ५ लाख ४८ हजार १११ रुपये आहे.