कार्मेलच्या गुणांचा गुंता सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:45 AM2017-06-23T00:45:59+5:302017-06-23T00:45:59+5:30
शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये येथील कारमेल हायस्कूलमधून इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना
पालकांना दिलासा : वाढीव गुणांसह सुधारित गुणपत्रिका मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये येथील कारमेल हायस्कूलमधून इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय कमी गुण देऊन निकालात घोळ झाला. त्यानंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविला. प्राचार्यांना घेरावही करण्यात आला. दरम्यान कारमेल स्कूलचे प्राचार्य जिग्नेश व चेन्नई बोर्डाने दिल्ली येथील मुख्य बोर्डाकडे पाठपुरावा केल्यानंतर दिल्ली बोर्डाकडून नव्याने वाढीव गुण विद्यार्थ्यांना देऊन सुधारित गुणपत्रिका देण्याचे आश्वासन मिळाले. त्यामुळे आता कारमेल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळणार आहे.
सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कारमेल हायस्कूलमधील सर्वच १५२ विद्यार्थ्यांना कमी गुण देण्यात आले. तसेच तब्बल १७ विद्यार्थ्यांना सीजीपीए हा शून्य मिळाला होता. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे तब्बल ४० गुण शाळास्तरावर असतात. सदर गुण संबंधित गुण शाळा व्यवस्थापनातर्फे बोर्डाकडे पाठविले जातात. मात्र शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना गुण देण्यात उदासीनता दाखविल्यामुळे आमच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. परिणामी इयत्ता अकरावीत चांगल्या नामवंत महाविद्यालयात प्रवेश कसा घ्यावा, या विवंचनेत पालक सापडले होते. दरम्यान दररोज सात ते आठ पालक कारमेल हायस्कूलमध्ये जाऊन प्राचार्यांना धारेवर धरत होते. पालकांची आक्रमकता वाढत असताना शाळा व्यवस्थापनाने पाठपुरावा कायम ठेवला. आता सकारात्मक निर्णय झाला आहे.
पालकांना सहकार्याचे आवाहन
शाळा व्यवस्थापन व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या वतीने कार्मेल हायस्कूल प्रवेशद्वारावर पालकांना आवाहन करणारे फलक लावण्यात आले. इयत्ता दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यासाठी व्यवस्थापक मंडळाकडून सीबीएसई बोर्ड चेन्नई येथे पाठपुरावा सुरू आहे. याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे, असा उल्लेख करीत पालकांनी शाळा व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या चिंतेने पालक संतप्त झाले होते.