दर्जेदार शैक्षणिक धाेरणाची अंमलबजावणी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:47 AM2021-02-25T04:47:21+5:302021-02-25T04:47:21+5:30
देसाईगंज : व्यक्ती व राष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी दर्जेदार शैक्षणिक धोरण तयार करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. १९८६नंतर ...
देसाईगंज : व्यक्ती व राष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी दर्जेदार शैक्षणिक धोरण तयार करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. १९८६नंतर निर्माण झालेले व जुलै २०२०मध्ये संसदेने मान्य केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे यापूर्वीच्या शैक्षणिक धोरणाहून बऱ्याचअंशी वेगळे आहे, असे प्रतिपादन बिहार येथील समाजशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र राम यांनी केले.
नूतन शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्यावतीने ‘नवीन शैक्षणिक धोरण - २०२०’ या विषयावर आभासी पद्धतीने राष्ट्रीय वेबिनार आयाेजित करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बाेलत हाेते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. जितेंद्र राम यांनी नवीन शैक्षणिक धोरण, त्याची वैशिष्ठ्य, त्यातील भक्कम तथा कमकुवत बाबी आदींवर विस्तृत प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. शंकर कुकरेजा हाेते. विद्यार्थी व संलग्न घटकांसाठी दर्जेदार उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असून, नवीन शैक्षणिक धोरण समजून घेऊन त्यातील सुधारणांसह ते लागू करण्याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीराम गहाणे यांनी केले तर प्रा. डॉ. विठ्ठल चव्हाण यांनी आभार मानले. या वेबिनारला भारतातील विविध विद्यापीठांमधील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. वेबिनारच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एच. एम. कामडी, प्रा. डॉ. जे. पी. देशमुख, प्रा. राजू चावके, प्रा. निहार बोदेले, प्रा. नीलेश हलामी, प्रा. मिथुन राऊत यांनी सहकार्य केले.