१३ हजार ७३५ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:34+5:30

खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही.

Quarantine period of 13 thousand 735 citizens completed | १३ हजार ७३५ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण

१३ हजार ७३५ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण

Next
ठळक मुद्दे२,८७३ अजूनही निरीक्षणाखाली : एकूण १६ हजार ६०८ नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुसऱ्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या एकूण १६ हजार ६०८ नागरिकांपैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. उर्वरित २ हजार ८७३ नागरिकांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण व्हायचा आहे. आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेला, मात्र होम क्वॉरंटाईनसाठी नोंदणी न करताच एखादा नागरिक गावात फिरत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळवावी. सामान्य व्यक्तीला आजाराची लक्षणे दिसून आली नसली तरी त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये. अचानक आजारी अथवा आरोग्यविषयक तक्रारी असल्यास त्यांनी आपली माहिती जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार थांबविण्याबाबत आशा वर्कर व वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. इतरही विभागांचे अधिकारी व कर्मचाºयांनीही स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अजुनही नियंत्रणात आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यांनी पुढे केला मदतीचा हात
गडचिरोली येथील अभिलाष चुटे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. तसेच गडचिरोली येथील विजय चौधरी यांनी २५ हजार रुपये, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी २५ हजार रुपये, आरमोरी येथील प्रविण राहाटे यांनी ३ हजार रुपये तसेच फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोलीतफे १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे. अडचणीच्या कालावधीत दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

गर्दीचे कार्यक्रम घेतल्यास आयोजकावर गुन्हा
कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नसून सण, उत्सव घरीच साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. कोणी गर्दी होणारा एखादा कार्यक्रम घेतला तर आयोजकावर गुन्हा दाखल होईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

येत्या काळात हनुमान जयंती, गुड फ्रायडे, महात्मा फुले जयंती, इस्टर संडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व इतर काही सार्वजनिक उत्सवाचे कार्यक्रम येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घरीच उत्सव साजरे करावे, याबाबत धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे. कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी गर्दी झाल्यास आयोजकासह त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. कोणालाही कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे कार्यक्रम घेण्याकरिता प्रशासनाकडे मागणी करू नये. सर्व स्तरावर संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

गरजूंची माहिती तहसीलदारांना द्या
संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने एखादे कुटुंब किंवा नागरिक अडचणीत असेल तर याबाबतची माहिती संबंधित तहसीलदारांना द्यावी. तसेच जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या मदत केंद्रावरही संपर्क साधून अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Quarantine period of 13 thousand 735 citizens completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.