ग्रामीण भागातील गोदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:29+5:302021-03-10T04:36:29+5:30
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. ...
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र त्यांना नागरी सुविधा मिळत नाही.
अल्पवयीन चालकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतुक पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजुला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवाशी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र प्रवाशी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाली असल्याने त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. बऱ्याच प्रवाशी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकारीने रंगल्या असून घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशुंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्करासाठी अनेक अडचणी येतात.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भीवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठिण होत असल्याने सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी.
केरोसीनचा पुरवठा वाढविण्याची मागणी
एटापल्ली : राज्य शासनाने शहरी व ग्रामीण भागासाठी केरोसीनचे परिमान निश्चित केले आहे. केरोसीनचा कोटा कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आले आहेत.
गावकऱ्यांचे हाल
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहचलेल्या नाहीत. तळोधी मो., भेंडाळा, कान्होली, कमळगाव या भागात पक्के रस्ते तयार केले नाही.
अतिक्रमण वाढले
गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे.
मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवा
धानोरा : तालुक्यातील मोहली बीएसएनएलचा मनोरा आहे. परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाहीत मनाेरे नाहीत.
भिकारमौशी मार्गाची दुरवस्था कायम
गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमण करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या आहेत. शालेय विद्यार्थी व नागरिक येथून आवागमण करीत असतात.
वसा येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बायोगॅससाठी अनुदान वाढविण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्या प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग होण्यासाठी मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांना बायोगॅससाठी अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
राजोलीत अर्धवट पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरूस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.
कोडसेपल्लीतील समस्या सोडवा
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा
सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही.
रेगडी येथे बँंक शाखा स्थापन करा
घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.
शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवा
मुलचेरा : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युत तारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये याकरिता तारा हटवाव्या, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु ग्रामीण भागातील इतर शेतकºयांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.
नळ जोडणीची तपासणी करा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही.
मातीच्या बांधाचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी
आलापल्ली : वनविभागातर्फे जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
पट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा द्या
वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकºयांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारापासून वंचित आहेत.