ग्रामीण भागातील गोदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:10+5:302021-03-14T04:32:10+5:30
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र ...
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र त्यांना नागरी सुविधा मिळत नाही.
अल्पवयीन चालकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाली असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकारीने रंगल्या असून घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्करासाठी अनेक अडचणी येतात.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा(कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुयस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुयस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याचे अद्यापही दुयस्ती करण्यात आली नाही.
सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा
अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याने वाहनांचा कर्कश आवाज शहरातील नागरिकांना ऐकावा लागत आहे.
रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
घोट : शेतीकडे जाणा-या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पाणंद रस्ता म्हटले जाते. या पादंन रस्त्यांवर शेतक-यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोतून बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
ऑनलाईन सातबारा झाला डोकेदुखी
ठाणेगाव : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतक-यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
अवैध ले-आऊटचा गोरखधंदा जोरात
मुलचेरा : मुलचेरा शहरात अनेक भूमाफियांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर प्लॉट पाडून अवैधरित्या कब्जा करून सदर प्लॉट विक्री करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र याकडे नगर विकास व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध ले-आऊटचा धंदा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
समाजकल्याण विभागाचे वसतिगृह हवे
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
भरधाव वाहनांवर कारवाई थंड बस्त्यात
आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थंड बस्त्यात आहे.
भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी अंधारात
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.
प्रवाशी निवाऱ्याला झुडुपांचा वेढा
मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला झुडुपांनी वेढले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाही. उन्हातच बसची वाट बघत बसावे लागते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाच्या वतीने प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती केली जात नाही.
रिक्त पदांमुळे होतोय कामांवर परिणाम
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
आठवडी बाजारात ओट्यांची निर्मिती करा
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यासह ग्राहकांना त्रास होत आहे.
जिल्हा परिषदेसमोर वाढले अतिक्रमण
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजुला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.