वडधातील बाजाराच्या जागेचा प्रश्न कायमच
By admin | Published: May 25, 2014 11:35 PM2014-05-25T23:35:23+5:302014-05-25T23:35:23+5:30
वडधा येथे दर रविवारला आठवडी बाजार भरत असतो. वडधा येथे परिसरातील नागरिक बाजार करण्यासाठी मोठय़ा संख्येने येत असतात. सदर बाजार डार्ली मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भरत असतो.
वडधा : वडधा येथे दर रविवारला आठवडी बाजार भरत असतो. वडधा येथे परिसरातील नागरिक बाजार करण्यासाठी मोठय़ा संख्येने येत असतात. सदर बाजार डार्ली मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भरत असतो. वाढत्या अंतर्गत वाहतुकीमुळे डार्ली मार्गावर वाहनाची कोंडी होत असते. त्यातच बाजाराच्या दिवशी बैलांचे कळपसुध्दा याच मार्गावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने बैल मोकाटच आहेत. परंतु सायंकाळच्या सुमारास बैल बाजारात भाजीपाला खाण्यासाठी येतात. त्यामुळे ग्राहकांसह विक्रेत्यांचीही तारांबळ उडत असते. पावसाळय़ात तर डार्लीच्या जंगलात गुराखी बैल चारण्यासाठी याच मार्गाने नेत असतात. सायंकाळी परत याच मार्गाने बाजारातून बैल आणीत असतात. त्यामुळे आधीच अरूंद असलेला रस्ता बैलांनी भरून जातो. ग्राहकांना रस्त्यावर उभे राहणेसुध्दा जागा उरत नाही. मागील अनेक दिवसांपासून वडधा येथे आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून स्थानिक प्रशासनाकडे करण्यात येत आहे. परंतु सदर मागणीकडे स्थानिक प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वडधा परिसरातील ग्राहक व विक्रेत्यांनाही बाजारात नाहक त्रास सहन करावा लागतो. बाजार दुसर्या ठिकाणी हलविल्यास आणखी विस्तार वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या मागणीची दखल घेत वडधा येथे आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील विक्रेते व ग्राहकांनी केली आहे. (वार्ताहर)