पोलीस पाटलांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:32 PM2019-01-02T23:32:53+5:302019-01-02T23:33:56+5:30

जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे; मात्र जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील गावांमध्ये अजूनही नक्षल दहशतीच्या सावटामुळे या पदासाठी अर्ज भरण्यासाठी कोणीही धजावत नसल्याची वास्तविकता समोर आहे.

Question marks on the police appointments | पोलीस पाटलांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह

पोलीस पाटलांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह

googlenewsNext
ठळक मुद्देएटापल्ली, भामरागड, कोरची तालुक्यातील स्थिती : गडचिरोली, चामोर्शी, अहेरी उपविभागात रोस्टरची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे; मात्र जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील गावांमध्ये अजूनही नक्षल दहशतीच्या सावटामुळे या पदासाठी अर्ज भरण्यासाठी कोणीही धजावत नसल्याची वास्तविकता समोर आहे.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा असलेले पोलीस पाटलाचे पद प्रत्येक गावासाठी महत्वाचे असते. गावातील घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. मात्र नक्षलदृष्ट्या संवेदनशिल जिल्ह्यात आजच्या स्थितीत पोलीस पाटलांची १५३५ पैकी ७०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. गावातील नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयातून आतापर्यंत शंभरावर पोलीस पाटलांची नक्षल्यांनी हत्या केली आहे.
अनेक वर्षांपासून ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालीच झाल्या नाहीत. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी यासाठी पुढाकार घेत पोलीस पाटील व कोतवालांच्या जागा भरण्याचे निर्देश सहाही उपविभागीय अधिकाºयांना दिले. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे.
गडचिरोली, चामोर्शी आणि अहेरी उपविभागातील रिक्त पदांचे रोस्टर अद्याप तयार होणे बाकी आहे. पेसा कायद्यामुळे त्या गावातील पोलीस पाटलाचे पद अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकरिता राखीव ठेवण्याचा नियम आहे. त्यामुळे हे रोस्टर तयार होताच या उपविभागातील सहा तालुक्यात पदभरतीची प्रक्रिया सुरू होईल.
एटापल्ली उपविभागातील एटापल्ली आणि भामरागड तालुक्यांसाठी ३० डिसेंबरला लेखी परीक्षा तर १ जानेवारीला तोंडी परीक्षा झाली. देसाईगंज उपविभागातील देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यातील ३८ रिक्त पदांपैकी ३३ पदांची भरती होत आहे. लेखी परीक्षा आटोपली असून उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती (तोंडी परीक्षा) ७, ८ व ९ जानेवारीला होणार आहे.
कुरखेडा उपविभागातील कुरखेडा व कोरची तालुक्यांसाठी ३० डिसेंबरला लेखी परीक्षा झाली. दि.४ पासून मुलाखती होतील. या उपविभागात ९९ पदांसाठी जाहीरात काढली होती. त्यासाठी २५४ अर्ज आले होते, परंतू त्यापैकी ४९ अर्ज अपात्र ठरले. उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत ४५ टक्के गुण आवश्यक असल्याने ९९ गावांपैकी केवळ ४० गावांसाठी ८६ उमेदवार उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यामुळे ५९ गावांमधील पोलीस पाटलांचे पद रिक्तच राहणार आहे.
प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचे काम पोलीस पाटील करतात. याशिवाय रहिवासी दाखले देण्यासाठीही त्यांची गरज असते. त्यांची निवड संबंधित क्षेत्राच्या उपविभागीय दंडाधिकाºयांमार्फत (एसडीओ) होत असली तरी त्यांचा प्रामुख्याने संबंध पोलीस यंत्रणेशी असतो. गावातील तंट्यांपासून तर घडणाºया प्रत्येक घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असते. एकदा रितसर निवड झाल्यानंतर वयाच्या ६० वर्षापर्यंत ती व्यक्ती पोलीस पाटीलपदी राहते. दर १० वर्षांनी त्यांची पुनर्नियुक्ती केली जाते.
२५२ जागांसाठी केवळ ८५ अर्ज
सध्या एटापल्ली, देसाईगंज, कुरखेडा या तीन उपविभागांनी पोलीस पाटलांच्या भरतीची जाहीरात काढून अर्ज मागविले. यात एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात २९८ गावांपैकी २५२ गावांत पोलीस पाटलांच्या जागा रिक्त असताना केवळ ६० गावांसाठी ८५ अर्ज आले. त्याचप्रमाणे कुरखेडा उपविभागातील कोरची तालुक्यात २५ आणि कुरखेडा तालुक्यात २ गावांसाठी कोणीच अर्ज दाखल केले नाही. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे तिथे कोणी पोलीस पाटलाचे पद स्वीकारण्यास इच्छुक नाही.
अनेक पाटलांची हत्या
नक्षल्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिल्याचा ठपका ठेऊन नक्षल्यांकडून आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त पोलीस पाटलांची हत्या करण्यात आली आहे. १९८५ पासून झालेल्या या हत्यांचे सत्र अलीकडे कमी झाले आहे.

Web Title: Question marks on the police appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.