‘त्या’ मेंढपाळ कुटुंबासमोर निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 05:00 AM2021-09-17T05:00:00+5:302021-09-17T05:00:43+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : मेंढपाळ कुटुंब हे वर्षभर जंगलात मेंढ्या चरायला घेऊन जातात व त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. १५ सप्टेंबरला गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील देवावार या मेंढपाळ कुटुंबातील सात वर्षांच्या बालकावर बिबट्याने जंगलात हल्ला करून ठार केले. वाघ-बिबट्यामुळे आता जीवालाच धोका निर्माण झाला, तर जंगलात जायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात.
गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात. त्यामुळे साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश होण्याची भीती असते. तरीही ते जीवावर उदार होऊन जंगलात झोपतात. काही दिवसांपूर्वी कोरचीजवळ मेंढपाळ कुटुंबातील १०० ते १३० मेंढ्या वीज पडून ठार झाल्या होत्या.
जीवावर उठलेल्या वाघांचा बंदोबस्त करा
देसाईगंज : काही दिवसांत वाघाने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. त्या वाघास मानवी रक्ताची चटक लागल्याने आणखीही अनेकांचा जीव तो घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदनातून केली आहे.
n वाघाने नुकतेच आरमोरी तालुक्यातील देलोडा खुर्द येथील इसमास तर बिबट्याने मार्कंडा येथील जंगलात गोंडपिपरी तालुक्यातील सात वर्षीय बालकास ठार केले. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील बोळधा (गावगन्ना) ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावणवाडी टोली येथील प्रभू नैताम यांच्या गोठ्यात बांधलेल्या १५ शेळ्या बिबट्याने ठार केल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीत वावरत आहे. सदर बिबट कधीही मानवावर हल्ला करून जीव घेण्याची शक्यता लक्षात घेता त्याला तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी आ. गजबे यांनी केली.