येवली येथे जलद बसचा थांबा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:38 AM2021-03-23T04:38:56+5:302021-03-23T04:38:56+5:30
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसथांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे ...
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसथांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्यांव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. त्यामुळे येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.
मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट
गडचिरोली : विविध कामांसाठी लागणाऱ्या मुद्रांकांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रुपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रुपयांचे मुद्रांक ५५० रुपयांना विकले जात आहे. मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांकाच्या किमतीवर कमिशन मिळत असल्याने त्यांना आगाऊचे पैसे देण्याची गरज नाही.
डिजिटल बॅनरमुळे पेंटर झाले बेराेजगार
सिरोंचा : संगणकाद्वारे विविध मल्टी कलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे बनविण्यात येतात. ते कमी किमतीत कमी वेळात उपलब्ध होतात. त्यामुळे विविध रंगांचे डबे व ब्रश घेऊन दिसणारे पेंटर आता दिसेनासे झाले आहेत.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर वाढला
अहेरी : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागांत सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
अहेरी : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगढ, आंध्र प्रदेश या राज्यांतून अवैध गुटखा विक्रीस आणला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवा-याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवा-याची दुरुस्ती करावी.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री जाेरात
रांगी : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लीटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
भामरागड तालुक्यातील शाळांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होताे. मात्र, वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीजपुरवठा आवश्यक झाला आहे.
विटांचे भाव कडाडले
देसाईगंज : घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात विटांची निर्मिती केली जाते. महागाईचा फटका विटा व्यवसायालाही बसत आहे. मजुरी, धानाचा काेंडा व इतर बाबींच्या किमती वाढल्याने विटांचे भावही वाढले आहेत.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेली जनावरे पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावी लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जि.प.समोरील अतिक्रमण वाढतीवरच
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र, या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.
सभागृहामागे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात.
मुरूमगाव परिसर समस्यांच्या गर्तेत
मुरूमगाव : छत्तीसगढ राज्याच्या सीमेवर असलेल्या मुरूमगाव परिसरातील अनेक गावांमध्ये वीज पाेहाेचली नाही. पक्के रस्ते नसल्याने पायवाटेचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक गावांमध्ये वीज नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य राहते.