वन्यप्राण्यांकडून रबी पिकांचे नुकसान
By Admin | Published: March 18, 2016 01:27 AM2016-03-18T01:27:39+5:302016-03-18T01:27:39+5:30
येथून जवळच असलेल्या कासवी, पळसगाव येथील रबी पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे.
शेतकरी अडचणीत : पंचनामा करण्यास वन विभागाची टाळाटाळ
जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या कासवी, पळसगाव येथील रबी पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. वन विभागाही आर्थिक मदत देत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचण वाढली आहे.
पळसगाव, कासवी परिसरात धान पिकाबरोबरच हरभरा, वाटाणा, लाखोळी, उडीद, मूग, तूर आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेत जंगलाला लागून आहेत. रबी पीक काढणीच्या मार्गावर असताना जंगली डुकरे या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. जीव धोक्यात घालून शेतकरी रात्रीच्या सुमारास पाहारा देत आहेत. तरीही रानडुकरांकडून रबी पिकांचे नुकसान केले जात आहे.
वन्य जीवांनी पिकांचे नुकसान केल्यानंतर त्याबाबतची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. याबाबत वन विभागाला कळवूनही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यास उडावाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे वन विभागाकडून जी थोडीफार मदत मिळण्याची अपेक्षा होती, ती सुध्दा कमी होत आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)