ढगाळ वातावरणामुळे रबी पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:16 AM2018-12-10T00:16:07+5:302018-12-10T00:17:51+5:30
देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने ही पिके धोक्यात आली आहे. खरीप हंगामातील अर्धे पीक हातून गेल्यानंतर पुन्हा रबी हंगामात निसर्गाची वक्रदृष्टी पाहून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या धान पिकाची मळणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या भागातील शेतकरी धानपीकासह शेतातल्या बांधावर तूर हे आंतरपीक म्हणून घेतात. आपल्या उत्पादनात चांगली आर्थिक मदत म्हणून शेतकरी तूर व रबी हंगामातील इतर पिकांकडे पाहत असतात. मात्र गेल्या शुक्रवारपासून सूर्याचे दर्शन होत नसून वातावरणात धुकेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणात मंद गारवा पसरला आहे. परिणामी फुलोऱ्यावर येऊन भरत असलेल्या शेंगांवर अळी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम पडणार असल्याची शक्यता शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे.
विसोरा गावालगतच्या शेतात धान पिकाच्या कापणीचे काम पूर्ण झाले असल्याने बांधावरील तूर पिकाने शेत परिसर आता हिरवागार दिसत आहे. त्यात तूर पीक फुलावर असून हिरव्या रंगात पिवळसर छटा असल्याचे भासते. परंतु मागील तीन दिवसांपासून दिवसभर सूर्यकिरणे एखाद्याक्षणी बाहेर निघत आहेत. परिणामी ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला धोका निर्माण झाला आहे. फूल फुलून शेंगांमध्ये दाणा भरण्यास सुरूवात झाली असताना, अशावेळी सुर्याची वक्रदृष्टी झाल्याने तूर पिकाच्या शेंगावर काळी व पांढऱ्या रंगाची अळी पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ढगाळ वातावरण असेच कायम राहिल्यास फुलोरा प्रभावित होऊन त्याचा थेट परिणाम तूर पिकावर होण्याची शक्यता आहे.
देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात मूग, उडीद, चणा, लाखोळी आदी पिकांची यंदा लागवड करण्यात आली आहे. ही पिके सुध्दा भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे या पिकांना सुध्दा धोका निर्माण झाला आहे. आधीच खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांवर दुष्काळाचे संकट कोसळले.
आता रबी हंगामातही दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.