रबीचे धान उत्पादन दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:53 AM2018-05-20T00:53:48+5:302018-05-20T00:53:48+5:30
ज्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. उष्ण व दमट हवामान धान पिकाला पोषक ठरल्याने यंदा रबीच्या धान उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ज्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. उष्ण व दमट हवामान धान पिकाला पोषक ठरल्याने यंदा रबीच्या धान उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रांपैैकी एकट्या देलनवाडी आविकाच्या धान केंद्रावर आत्तापर्यंत दोन हजार क्विंटल धानाची आवक झाली आहे.
चालू हंगामातील रबीची धान खरेदी करण्याकरिता आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यात १४ केंद्र खरेदी केंद्र सुरू केले असून शासनाने प्रति क्विंटल १ हजार ५५० रूपये हमीभाव दिला आहे. रबी हंगामातील धान मळणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या केंद्रावर आत्तापर्यंत दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त धानाची खरेदी झाल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक बी. पी. घोडमारे यांनी दिली.
खरीप हंगामात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्केच उत्पादन झाले होते.
बोनससाठीची मर्यादा
आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस दिला जातो. एका सातबारावर ५० क्विंटल धान विक्रीची मर्यादा आहे. ज्या शेतकºयांनी आपल्या सातबारावर खरीप हंगामात ५० क्विंटल धानाची विक्री केली असेल अशा शेतकऱ्यांनी त्याच सातबारावर रबी हंगामातील धानाची विक्री केल्यास अशांना बोनस मिळणार नाही, अशी माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली.