रबी हंगामातील ७० हजार क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:07 PM2019-07-01T22:07:49+5:302019-07-01T22:08:08+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ च्या खरीप व रबी हंगामात विक्रमी धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामातील गडचिरोली कार्यालयाचे धान भरडाईचे काम ८५ टक्के तर अहेरी कार्यालयाचे काम ५७ टक्क्यावर पोहोचले.

Rabi season 70 thousand quintals of open paddy | रबी हंगामातील ७० हजार क्विंटल धान उघड्यावर

रबी हंगामातील ७० हजार क्विंटल धान उघड्यावर

Next
ठळक मुद्देपावसाने नुकसानीची शक्यता : गडचिरोलीत ८५ टक्के तर अहेरीत ५७ टक्के भरडाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ च्या खरीप व रबी हंगामात विक्रमी धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामातील गडचिरोली कार्यालयाचे धान भरडाईचे काम ८५ टक्के तर अहेरी कार्यालयाचे काम ५७ टक्क्यावर पोहोचले. सद्य:स्थितीत रबी हंगामातील जवळपास ७० हजार क्विंटल धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आला आहे. या धानाची लवकर उचल न झाल्यास पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयामार्फत २०१८-१९ च्या खरीप हंगामात एकूण ७ लाख २७ हजार ८९८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यापैकी केंद्रावरून धानाची उचल करून ६ लाख २२ हजार ३८८ क्विंटल धानाची राईस मिलर्सकडून भरडाई करण्यात आली. आता १ लाख ३ हजार १२१ क्विंटल धान आविका संस्थेकडे शिल्लक आहे. एवढ्या धानाचे भरडाईचे आदेश देणे शिल्लक आहे. १ लाख ३ हजार १२१ क्विंटल पैकी १ लाख २ हजार क्विंटल धान संस्थेच्या गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे.
खरीप हंगामातील केवळ एक हजार क्विंटल धान उघड्यावर आहे. रबी हंगामात गडचिरोली कार्यालयाच्या हद्दितील केंद्रावर १ लाख १२ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ३३ हजार ३९५ क्विंटल धान भरडाईसाठी मिलर्सकडे देण्यात आले आहे. आविका संस्थेकडे शिल्लक असलेल्या ७८ हजार ७३३ क्विंटल धानापैकी १६ हजार क्विंटल धान गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आले. रबी हंगामातील उर्वरित ६० हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे.
अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप हंगामात २ लाख ८२ हजार ४५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक धानाची मिलर्सकडून भरडाई करण्यात आली आहे.
उर्वरित सर्व धान गोदामात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दितील रबी हंगामातील अंकिसा व वडधम या दोन केंद्रावरील केवळ १० हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे.
आठवडाभरात धानाची उचल करणार
खरीप हंगामातील धान उघड्यावर नाही. रबी हंगामातील उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाची येत्या आठवडाभरात उचल करण्यात येईल. जेणे करून महामंडळ व आविका संस्थेचे पावसाने नुकसान होणार नाही, अशी माहिती महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे उपव्यवस्थापक मुळेवार व गडचिरोली कार्यालयाचे उपव्यवस्थापक उमाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Rabi season 70 thousand quintals of open paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.