९१४ हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:22 PM2017-11-11T23:22:26+5:302017-11-11T23:22:40+5:30

गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाचे एकूण २८ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ९१४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या ९ नोव्हेंबरच्या अहवालात म्हटले आहे.

Rabi sowing on 9 14 hectares | ९१४ हेक्टरवर रबीची पेरणी

९१४ हेक्टरवर रबीची पेरणी

Next
ठळक मुद्दे२८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र : खते, बि-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाचे एकूण २८ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ९१४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या ९ नोव्हेंबरच्या अहवालात म्हटले आहे.
खरीप बरोबरच गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, मका, हरभरा, लाखोळी, उडीद, बरबटी, चवळी, वाल, पोपट, जवस, तीळ, भूईमुग आदी पिकांचा समावेश आहे. काही शेतकºयांकडे रबी हंगामासाठी स्वतंत्र शेती आहे. तर काही शेतकरी धान निघल्यानंतर त्याच बांधीत रबी पिकांची पेरणी करतात. त्यामुळे धान पिकाची कापणी व बांधणी झाल्याशिवाय रबी पिकांच्या पेरणीला वेग येणार नाही. सद्य:स्थितीत ज्या शेतकºयांकडे स्वतंत्र रबीची शेती उपलब्ध आहे. अशाच शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ४०० हेक्टर एवढे आहे. शासनाने शेतकºयांना अनुदानावर विहिरी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन रबी पिकांची पेरणी करण्याकडे शेतकºयांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे रबी क्षेत्रामध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचे दिसून येते. चालू वर्षात ३१ हजार ५३१ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार कृषी विभागाने खत, बियाणे, कीटकनाशके यांचे नियोजन केले आहे. मात्र यावर्षी केवळ ७५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे तलाव, बोड्या आटल्या आहेत. भूजल पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी नियोजित क्षेत्राच्या कमी प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी शेतकरी जवस, तीळ यासारख्या पिकांचे उत्पादन घेत होते. मात्र या पिकांचे उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली असून गहू, मका आदी नगदी पिकांकडे शेतकरी वळला असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र दरवर्षी वाढत चालले आहे. प्रयोगशिल शेतकरी पश्चिम महाराष्टÑात घेतल्या जाणाºया पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.
३१ हजार हेक्टरचे नियोजन
दिवसेंदिवस सिंचनाच्या सुविधा वाढत चालल्या असल्याने रबी पिकाखालील क्षेत्र सुध्दा वाढत चालले आहे. २०१७-१८ च्या खरीप हंगामात ३१ हजार ५३१ हेक्टरवर पेरणी होईल, या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार खते व बि-बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गहू पिकाची लागवड ७५५ हेक्टरवर होणार आहे. ज्वारी ३ हजार ५०० हेक्टर, संकरीत मका २ हजार ६५६, हरभरा ३ हजार ८३०, लाखोळी १३ हजार ९५०, मूग १ हजार ८००, जवस २ हजार ८५०, तीळ १ हजार २८८, सूर्यफूल २८, करडई ६६, भूईमुग ६००, वाटाणा पिकाची २०० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
१४ हजार हेक्टरवर लाखोळी पीक
लाखोळीपासून डाळ बनविली जाते. यापूर्वी लाखोळी बाजारपेठेत विकण्यास बंदी घातली होती. मात्र पाच वर्षांपूर्वी शासनाने लाखोळीवरील बंदी हटविली आहे. त्यामुळे अधिकृतपणे लाखोळीची विक्री करता येते. परिणामी चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी लाखोळी पिकाकडे वळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १४ हजार हेक्टरवर लाखोळी पिकाची लागवड केली जाते. लाखोळी पिकासाठी स्वतंत्र जमीन कसण्याची गरज नाही. त्याचबरोबर या पिकाला खतही द्यावे लागत नाही. कमी खर्चात लाखोळीचे पीक होत असल्याने धान उत्पादक शेतकरी या पिकाकडे वळत चालले आहेत. धानपिकाची कापणी करण्यापूर्वी धान पीक उभे असतानाच बियाणे शिंपले जातात.
धान कापणीनंतर वेग
बहुतांश शेतकरी धान पिकाच्या बांधीतच रबी पिकांची पेरणी करतात. त्यामुळे धानाची कापणी झाल्यानंतर रबी पिकांच्या पेरणीला वेग येणार आहे. विशेष करून जवस, उडीद, मूग, लाखोळी, चना, वाटाणा, गहू आदी पिकांची लागवड धानाच्या बांधीतच केली जाते. धान निघल्यानंतर जमीन मशागतीला सुरूवात होते.
सूर्यफूल पिकाकडे ओढा
रबी हंगामात सूर्यफूल पिकाकडे शेतकºयांचा ओढा वाढत चालला आहे. नदीच्या काठावर ज्या शेतकºयांचे शेत आहेत. असे शेतकरी सूर्यफूल पिकाची लागवड करतात. या पिकाला पाणी द्यावे लागते. काही शेतकरी धानपीक निघल्यानंतर त्याच बांधीमध्ये सूर्यफुलाची लागवड करतात. विशेष करून चामोर्शी तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये सूर्यफूल पिकाचा पेरा वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Rabi sowing on 9 14 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.