भाजप-राकाँच्या मनोमीलनातून रवींद्रबाबा आत्राम झाले सभापती
By admin | Published: January 11, 2017 02:10 AM2017-01-11T02:10:48+5:302017-01-11T02:10:48+5:30
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्रबाबा आत्राम यांची वर्णी लावण्यात आली आहे.
भाजपाचे बिनशर्त समर्थन : अहेरी बाजार समितीची निवडणूक
अहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्रबाबा आत्राम यांची वर्णी लावण्यात आली आहे. मंगळवारी बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत रवींद्र आत्राम सभापती पदी तर उपसभापतीपदी चैतु नरंगो उसेंडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या वेळी एकूण १८ पैकी ११ सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेला कंगाली केशव कुल्हे, येगोलपवार सत्यनारायण व्यंकटी, कोडपा मदना नानाजी, दहागावकर मारोती लचमा, मडावी निर्मला अशोक, सिडाम सोमी गोसाई, मारय्या संपत पोचम, पत्तीवार प्रशांत सुधाकर, सेनवाज महेबूब शेख आदी संचालक उपस्थित होते.
विजयानंतर रवींद्र आत्राम यांनी भाषणात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्यानेच मला सभापती पद मिळविता आले. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनात मी सर्वांच्या सहकार्याने काम करीन, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व सहकाऱ्यांनी राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. राकाँच्या विजयाबद्दल फटाके फोडून आतिषबाजी केली. निवडणुकीच्या प्रसंगी प्रकाश गुड्डेलीवार, मुत्तन्ना दोंतुलवार, श्रीकांत मद्दीवार, रवी नेलकुद्री, दामोधर सिडाम, कैलास कोरेत, पोशालू सुदरी, लक्ष्मण येर्रावार, निसार सय्यद, नगरसेवक शैलेश पटवर्धन, श्रीनिवास चटारे, कबीर शेख आदी भाजप व राकाँचे कार्यकर्ते हजर होते. (शहर प्रतिनिधी)