देशासाठी रजत पदक मिळविणाऱ्या राहुल मेश्रामची परिस्थितीशी फाइट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:55 PM2023-06-19T17:55:51+5:302023-06-19T17:57:30+5:30
अतिदुर्गम जिमलगट्टात चालवतो हॉटेल : किर्गिझस्थानच्या स्पर्धेसाठी निवड
संजय गज्जलवार
जिमलगट्टा (गडचिरोली) : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम जिमलगट्टा गावचा भूमिपुत्र राहुल मेश्राम हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत बॉक्सर खेळाडू आहे. यापूर्वी देशासाठी रजतपदक मिळविणारा राहुल पुढील महिन्यात किर्गिझस्थानमध्ये होऊ घातलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव रोशन करणाऱ्या या खेळाडूची आर्थिक परिस्थितीशी फाइट सुरू आहे. गावी हॉटेल चालवून त्याला उदरनिर्वाह भागवावा लागत आहे.
किर्गिझस्थान येथे रशियन आर्मी गेममधील बॉक्सिंग स्पर्धेत ७३ किलो वजनगटात राहुल मेश्रामचा भारतीय संघात समावेश आहे. ही स्पर्धा २३ ते २६ जुलैदरम्यान होणार आहे. याआधी २०१६ मध्ये दिल्लीत झालेल्या जागतिक मॅप गेममध्ये राहुलने भारताचे प्रतिनिधित्व करताना रजतपदक प्राप्त केले होते. आतादेखील त्याच्याकडून देशवासीयांना अपेक्षा आहेत.
आई अंगणवाडी सेविका, वडील मजूर
राहुल सुरेश मेश्राम हा मोठ्या बिकट परिस्थितीतून पुढे आला आहे. त्याचे वडील मजुरीकाम करत, तर आई अंगणवाडी सेविका होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यास बॉक्सिंगची आवड निर्माण झाली. त्याची चुणूक पाहून मोठ्या जिद्दीने आई-वडिलांनी त्यास पुण्याला प्रशिक्षणासाठी पाठवले, तेथेच त्याची कारकिर्द बहरली. मार्शल आर्टचे प्रशिक्षण प्रदीप शिंदे यांच्याकडून घेतले. या प्रवासात प्रदीप शिंदेंसह संतोष कुमार, रवी चर्लावार यांचे योगदान असल्याचे राहुल सांगतो.
खासगी शाळेत प्रशिक्षक म्हणून केले काम
घरची हलाखीची परिस्थिती असल्याने राहुल मेश्रामने प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातच एका खासगी शाळेत काही दिवस प्रशिक्षक म्हणून काम केले. २०१३ मध्ये त्याने पुण्यात झालेल्या राष्ट्रस्तरीय स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले. २०१६ मध्ये रजत पदक पटकावल्यावर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्याची निवड झाली. सन २०२३ मध्ये आग्रा येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे त्याची आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
परिस्थितीशी करतोय दोन हात
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव गाजविणाऱ्या राहुल मेश्राम या भूमिपुत्राची आर्थिक स्थिती आजही जेमतेम आहे. जिमलगट्टा येथे तो छोटेसे हॉटेल चालवून कुटुंबाचा गाडा चालवतो. मात्र, परिस्थितीशी दोन हात करून त्याने बॉक्सिंगची आवड जपली आहे.
स्पर्धेसाठी जायला नाहीत पैसे
किर्गिझस्थान येथील स्पर्धेसाठी जाण्याकरिता राहुल मेश्रामकडे पैसे नाहीत. यापूर्वी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यास आर्थिक साहाय्य केले; शिवाय मित्रपरिवार व परिसरातील दानशूर तसेच क्रीडाप्रेमी नागरिकही त्याच्यासाठी सरसावलेले आहेत.