अहेरीत तंबाखूच्या १० दुकानांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:23+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पानठेले बंद करण्याचे तसेच किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. परंतु या आदेशाची पायमल्ली करत छुप्या मार्गाने अहेरी तालुक्यात विक्री सुरूच आहे. पानठेले बंद असल्याने जास्त पैसा मिळविण्यासाठी किराणा दुकानदार तंबाखूजन्य पदार्थाची अवैध साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : किराणा दुकानातून होत असलेली तंबाखूजन्य साहित्याची विक्री रोखण्यासाठी शनिवारी अहेरी व आलापल्ली येथे एकूण दहा दुकानांवर नगरपंचायत, पोलीस प्रशासन व मुक्तिपथने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला.
विशेष म्हणजे, अहेरी, आलापल्ली शहरासह तालुक्यात ‘संचारबंदीतही खर्राविक्री जोमात’ या मथळ्याखाली लोकमतने १६ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासन व मुक्तिपथच्या वतीने सदर धाड सत्र राबविण्यात आले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पानठेले बंद करण्याचे तसेच किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. परंतु या आदेशाची पायमल्ली करत छुप्या मार्गाने अहेरी तालुक्यात विक्री सुरूच आहे. पानठेले बंद असल्याने जास्त पैसा मिळविण्यासाठी किराणा दुकानदार तंबाखूजन्य पदार्थाची अवैध साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करीत आहे. तालुक्यातील आलापल्ली हे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारे गाव असून येथील बाजारपेठही मोठी आहे. तंबाखूजन्य पदार्थाचा पुरवठा या गावातून सर्वत्र होतो. त्यामुळे हा प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समिती, मुक्तिपथ, पोलीस प्रशासन आणि येथील सरपंच सुगंधा मडावी यांनी आठ दुकानांत धाड टाकून तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करून विक्रेत्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकाराला. त्यानंतर कारवाईचा मोर्चा अहेरी शहरात वळविण्यात आला येथील तपासणीत दोन दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडले. नगर पंचायतची चमूही या कारवाईत सहभागी झाली होती. नगर पंचायतने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड विक्रेत्यांकडून वसूल केला. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीचे जिल्हा समन्वयक डॉ. नंदू मेश्राम, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, न. पं. मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, रूपाळी काळे, पोलीस कर्मचारी, मुक्तिपथचे केशव चव्हाण, मारुती कोलावार यांनीे कारवाई केली.