रेल्वेचे खात्रीशीर तिकीट मिळणार
By admin | Published: June 15, 2014 11:32 PM2014-06-15T23:32:43+5:302014-06-15T23:32:43+5:30
रेल्वेच्या २४ तासाआधी मिळणाऱ्या तत्काळ तिकीटातील वेटिंग आता पूर्णपणे बंद होणार आहे़ तत्काळ तिकीटामध्ये येत्या आॅगस्ट महिन्यापासून फक्त खात्रीशिर तिकीटच (कन्फार्म) मिळणार आहे.
देसाईगंज : रेल्वेच्या २४ तासाआधी मिळणाऱ्या तत्काळ तिकीटातील वेटिंग आता पूर्णपणे बंद होणार आहे़ तत्काळ तिकीटामध्ये येत्या आॅगस्ट महिन्यापासून फक्त खात्रीशिर तिकीटच (कन्फार्म) मिळणार आहे. यादिशेने रेल्वे विभागाच्या हालचाली सूरू झाल्या आहेत़
सर्वसाधारण तिकीटामध्ये वेटिंग सुरू झाल्यावर रेल्वे विभागाच्या २४ तासाआधी सुरू होणाऱ्या तत्काळ तिकिटांतर्गत तिकीट घेणाऱ्यांची गर्दी होते. काही मिनीटात तत्काळ तिकीटाचा कोटा देखील संपूष्टात येतो़ मात्र त्यानंतर तत्काळ मध्ये देखील वेटींग सुरू होते़ मात्र तत्काळ तिकीटाची वेटींग फारच कमी प्रमाणात कन्फार्म होते़ प्रवाशांचा नाईलाज असल्यामूळे प्रवाशी जादा रक्कम देऊन तत्काळचे तिकीट घेत असतात़ तत्काळ तिकीटाचे आरक्षण घेताना स्लिपर कोचसाठी प्रवाशांना जादाचे १५० रूपये शुल्क व एसी कोचसाठी ही रक्कम दुप्पट म्हणजे ३०० रूपये अदा करावे लागतात़ तत्काळ तिकिट रद्द होत नाही़ या समस्येमुळे प्रवाशांना तत्काळचे वेटींग तिकीट मिळूनही ते तिकीट निश्चित होत नाही़
तिकीटापोटी दिलेली रक्कम परत मिळत नाही़ या समस्येतुन मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्काळमध्ये वेटिंग न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आॅगस्ट महिन्यात होणार आहे. (वार्ताहर)