पावसाचा मिरचीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:27 AM2019-03-24T01:27:32+5:302019-03-24T01:28:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. तोडणी करून वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची पावसात भिजल्याने मिरची काळवंडल्याने दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, बालमुत्यमपल्ली, आसरअल्लीसह परिसरात अनेक शेतकरी मिरची पिकाची लागवड करतात. या परिसरातून नदी वाहत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदून त्या माध्यमातून शेतीला पाणी देतात. सध्या या भागात मिरची, कापूस, ज्वारी, मका आदी पिके उभी आहेत. यापैकी अनेक शेतकºयांनी मिरचीची तोडणी करून ती वाळू घातलेली आहे. मिरची तीन ते चार टप्प्यात तोडली जाते. सध्या मिरची तोडणीचा दुसरा व तिसरा टप्पा सुरू आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्याने वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची भिजली. काही शेतकºयांना पावसाची चाहूल लागताच त्यांनी मिरचीचे ढीग तयार केले. तरीसुद्धा पावसात मिरची भिजली. त्यामुळे मिरचीला बुरशी चढून ती काळवंडण्याची शक्यता आहे.
एकदा जर मिरची काळवंडली तर तिला अत्यल्प दर मिळतो. परिणामी शेतकºयांचे नुकसान होणार आहे. याशिवाय या भागात कापसाची अंतिम तोडणीही झालेली नाही. पावसाने कापूस भिजून त्यालाही अत्यल्प दर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी उन्हाळी धानाची लागवड केली असल्याने काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फायदा या पिकाला झाला आहे.