पावसाची उसंत, जनजीवन पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:20 AM2018-07-18T00:20:49+5:302018-07-18T00:21:29+5:30
रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मंगळवारी मात्र पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र कुरखेडा तालुक्यातील खोब्रागडी नदीला मंगळवारी पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलावर सोमवारी दुपारनंतर पाणी चढले होते. रात्री पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून वाहतूक सुरळीत झाली. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील पोटफोडी नदीची पाणी पातळी कमी झाल्याने याही मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच सुरू झाली. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, देवदा, हालेवारा मार्ग सुरू झाले. डुम्मी नाल्यावरील पूर ओसरल्याने जवेली, मरपल्ली, वासामुंडी मार्ग सुरू झाला आहे. धानोरा तालुक्यातीलही सर्वच मार्ग सुरू झाले आहेत.
गडचिरोलीनंतर सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात झाला होता. भामरागडजवळील पर्लकोटा नदी पुलावर रविवारी मध्यरात्री पाणी चढले. त्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता पुलावरील पाणी ओसरले. मात्र पुन्हा रात्री ९ वाजता पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. रात्रभरातून पाणी कमी झाल्याने मंगळवारी पुलावरील पाणी ओसरले. पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ, लाकडे, जमा झाली होती. त्यामुळे पूर ओसरला असला तरी वाहतूक होणे अशक्य होते. तहसीलदार कैलास अंडील यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील मलबा व लाकडे काढली. जवळपास सकाळी १० वाजतानंतर पुलावरून वाहतूक सुरू झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मातीच्या घरांना व नुकतेच रोवणे झालेल्या धान पिकाला बसला आहे. घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे. मात्र नेमक्या किती घरांचे नुकसान झाले, याचा अधिकृत आकडा प्राप्त होऊ शकला नाही. आठ दिवसांपूर्वी रोवणीला सुरूवात झाली होती. अशातच सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली. रोवलेले धान वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
व्यंकटेश सिडाम बेपत्ताच
प्राणहिता नदीत अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली घाटावरून व्यंकटेश सिडाम हा युवक वाहून गेला. बचाव पथकाने सोमवारी व मंगळवारी दिवसभर सदर युवकाचा शोध घेतला. मात्र तो मिळाला नाही. गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोध कार्यात अडचणीत येत आहेत. बुधवारी सुध्दा बचाव पथकातर्फे त्याचा शोध घेतला जाणार आहे.
खोब्रागडी नदीला पूर
मंगळवारी कुरखेडा, कोरची तालुक्यात दमदार पाऊस झाला. कुरखेडात १०० मिमी तर कोरची तालुक्यात ६८ मिमी पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. कातलवाडाकडे जाणाऱ्या पुलावर पाणी साचले होते. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. नदी लगत असलेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने रोवणीही वाहून गेले. मंगळवारी दुपारनंतर पुलावरील पाणी ओसरले. परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पं.स. उपसभापती मनोज दुनेदार यांनी परिस्थितीची पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी दुनेदार यांनी केली आहे.
पोटगावात घर कोसळले
देसाईगंज : तालुक्यातील पोटगाव येंथील गणेश वाढगुरे यांचे विटांचे घर कोसळले. त्यामुळे सुरज वाढगुरे हा लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. घराचा पंचनामा करण्यात आला आहे. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.