तीन महिन्यातच पडला वर्षभराचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:32+5:30
या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संपूर्ण वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात १५०२.३ मिमी एवढा पाऊस पडतो. मात्र यावर्षी पावसाने कहर केला आहे. १ जून ते ५ सप्टेंबर या जेमतेम तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १५२८.३ मिमी पाऊस पडला आहे. पुन्हा ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस अनेक वर्षातील रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळ्याचे समजले जातात. या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात १७००.२ मिमी, अहेरी तालुक्यात १६०६.६ तर एटापल्ली तालुक्यात १६०८ मिमी पाऊस झाला आहे.
गोसेखुर्द, संजय सरोवरचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा फुगली
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे २३ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे पाणी दुथडी भरून वाहात आहे. इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होऊन वाहात आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या सरोवराचेही पाणी वैनगंगा नदीला येऊन मिळते. जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी या नद्यांची पातळी चांगलीच वाढली आहे. वैनगंगा नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहे, मात्र प्राणहिता नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. दोन दिवसांपूर्वी इडियाटोह धरण ओव्हरफ्लो झाले. पाच वर्षानंतर हे धरण भरल्यामुळे त्याच्या नैसर्गिक सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ते पाणी जिल्ह्यातील काही नद्यांना मिळते.
चामोर्शी शहरात १० घरांची पडझड
संततधार पावसामुळे चामोर्शी शहरातील नऊ घरांची अशंत: तर एका घराची पूर्णत: पडझड झाली आहे. पडझडीमुळे संबंधित घरमालकांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अभय गेडाम, विश्वनाथ करंडे, नक्टू गवारे, ऋषीदेव घोंगडे, बेबी गव्हारे, माया कुनघाडकर, सावजी चिमुरकर, लक्ष्मी पिपरे, वसंत येनगंधलवार यांच्या घराची अंशत: पडझड झाली तर विनोद कोटांगले यांच्या घरांच्या भिंती पूर्णत: कोसळल्या. याशिवाय प्रभूदास नैताम, इंदिरा देवतडे, वच्छला चलाख, गीता किनेकर यांच्या घरांची पडझड झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. कुनघाडा रै. येथील चामोर्शी-कुनघाडा या मुख्य मार्गावर असलेल्या धान शेती पूर्णत: पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमनपल्ली गावास पुराचा वेढा
चामोर्शीच्या तालुक्यातील घोटपासून १५ ते २० किमी पासून असलेल्या सोमनपल्ली गावाला बुधवारी पुराने वेढा घातला. सदर गावात १४ घरे असून ५० च्या आसपास लोकसंख्या आहे. दुर्गम भागात हे गाव असून पाण्याने या गावाला चारही बाजुने वेढले होते. या घटनेची माहिती होताच चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथडे यांनी बोट व इतर कर्मचाऱ्यांसह सोमनपल्ली गावाकडे धाव घेतली. बोटीने व ट्रॅक्टरने पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत आबापूर नजीकच्या सोमनपल्ली या अतिदुर्गम गावात सायंकाळी ७ वाजता पोहोचले व तिथे मदतकार्य सुरू केले. गुरूवारी सकाळी महसूल विभागाच्या चमुने नागरिकांची भेट घेतली. नुकसानीचे पंचनामे केले. सर्वच घरात पाणी शिरले असल्याने बऱ्याच घरांची पडझड झाली. प्रशासनाच्या वतीने येथील प्रत्येक कुटुंबास १० किलो तांदूळ, तूर डाळ, तेल, तिखट आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. दुमजली असलेल्या एका घरात ५० लोकांनी आसरा घेतला.
अतिवृष्टीच्या धोक्यामुळे शैक्षणिक संस्थांना सुटी
प्रादेशिक हवामान केंद्राद्वारे देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाºयानंतर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ६ व ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे. शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांसह इतर शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुटी घोषित करण्यात आली आहे. मंगळवारपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग अजूनही आवागमनासाठी बंद आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थी मधेच कुठे अडकू नये व कुठलाही संभाव्य धोका टाळता यावा, या दृष्टीने प्रशासनाने सदर पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत अनेक भागात अतिवृष्टी झाली असून रस्त्याची स्थिती गंभीर बनली आहे. भामरागड तालुक्यासह बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा नागरिकांना फटका बसला आहे. एकूणच जिल्ह्यात आपतकालीन परिस्थिती उद्भवली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच दि.६ व ७ रोजी हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांची सुटी जाहीर केली आहे. सोमवारी नियमित शाळा भरेल.