पावसाचा हलक्या धानाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:00 AM2017-10-09T00:00:36+5:302017-10-09T00:00:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हलके धानपीक कापणीसाठी तयार झाले असताना मागील आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्याने हलक्या धानाचे प्रचंड नुकसान होत आहे. जड व मध्यम धानासाठी मात्र सदर पाऊस नवसंजीवनी ठरत आहे.
ज्या शेतकºयांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, असे शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलके धानपीक सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कापणी योग्य होते. जिल्ह्यात जवळपास पाच हजार हेक्टरवर हलक्या धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीसाठी तयार झाले असताना पावसाचा जोर वाढला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने काही शेतकºयांनी धानाची कापणी लांबणीवर टाकली आहे. तर ज्या शेतकºयांनी धानपीक कापले आहे, त्या शेतात पाणी जमा झाल्याने धानाच्या कडपा ओल्या होत आहेत. काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास बांधीमध्येच धान खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऐन कापणीच्या हंगामात धानपीक हातातून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे गरीब शेतकरीच हलक्या धानाची लागवड करतात. मात्र धानाच्या नासाडीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.
काही भागात वादळवाºयासह पाऊस होत आहे. याचा फटका जड व हलक्या धानालाही बसत आहे. पाऊस तसेच वादळामुळे अनेक ठिकाणचे धानपीक पडत आहे. निसवण्याअगोदरच धानपीक पडल्यास उत्पादनात कमालीची घट होते. त्याचबरोबर पडलेले धान कापतानाही अडचण निर्माण होते.
काही शेतकरी सोयाबिन, तीळ पिकाची लागवड करतात. सोयाबिन पकही कापणीला आले आहे. अशातच पाऊस येत असल्याने सोयाबिन पिकाचीही कापणी लांबली आहे. अवकाळी पावसाचा फटका सोयाबिन पिकाला सुद्धा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
जड धानासाठी संजीवनी
तलाव व बोड्या आटल्या आहेत. त्यामुळे जडधानाला पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच अधूनमधून पाऊस येत असल्याने जडधानासाठी नवसंजीवनी ठरली आहे. त्याचबरोबर सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकºयांचा पाणी देण्याचाही खर्च अवकाळी पावसामुळे कमी झाला आहे. परिणामी अवकाळी पावसाचे जड धान उत्पादक शेतकºयांकडून स्वागत होत आहे. जडधान सध्या गर्भात असून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यात या धानाच्या कापणीला सुरुवात होणार आहे.